नामफलक झाकला, पण योगदान झाकता आलं का? – रामराजे समर्थकांचा सवाल

0
9
नामफलक झाकला, पण योगदान झाकता आलं का? – रामराजे समर्थकांचा सवाल

फलटण | प्रतिनिधी – साहस Times :- अवकाळी पावसामुळे फलटण शहरात आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. प्रशासन, राजकीय नेते आणि सामाजिक संस्थांनी संकटात तातडीने रस्त्यावर उतरून मदतीचा हात दिला. त्या पाठीमागे मोठं नियोजन होतं आणि त्या नियोजनाची फळं दिसली — कारण अवघ्या काही दिवसांत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा देखील कोणत्याही अडथळ्याविना पार पडला.

या पार्श्वभूमीवर फलटण नगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केला होता. सोहळ्याचे ठिकाण होतं – फलटण नगरपालिका प्रशासकीय इमारतीतील ‘श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सभागृह’.

मात्र, याच कार्यक्रमात एक वादग्रस्त घडामोड घडली – सभागृहाच्या नावाचा नामफलक पडद्याने झाकण्यात आल्याचं दिसून आलं. विरोधक आणि नगरपालिका प्रशासन यांच्याकडूनच हे पाऊल उचलण्यात आलं, असा आरोप रामराजे समर्थकांनी केला असून त्यांनी सवाल उपस्थित केला की – “नामफलक झाकलात, पण कर्तृत्व कसं झाकाल?”

रामराजे हे सध्या फलटणचे आमदार असून राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आणि संस्थांचे अभिषिक्त अधिपती आहेत. अशा व्यक्तिमत्त्वाच्या नावाचा अपमान केल्याच्या भावना समर्थकांमध्ये आहेत. दिवसभर सोशल मीडियावर आणि नागरी चर्चांमध्ये हाच विषय गाजत राहिला.

एकीकडे फलटण नगरपालिका, विशेषतः मुख्याधिकारी श्री निखिल मोरे यांच्या कार्यशैलीचं कौतुक होतंय, तर दुसरीकडे नामफलक झाकण्याच्या कृतीमुळे प्रशासन आणि विरोधकांच्या संकुचित मानसिकतेवर टीका होत आहे.

फलटणमध्ये राजकारण आता केवळ कामगिरीवर नाही, तर “सन्मान झाकण्याच्या” कृतीवरही केंद्रित झाल्याचं चित्र सध्या तयार होत आहे.