
पितळखोरा लेणीतील बारकावे !
साहस Times :- प्राचीन काळातील खडकी जो इतिहासात औरंगाबाद या नावाने ओळखला गेलाय व सद्द स्थितीत छत्रपती संभाजीनगर या नावाने ओळखला जातो या शहरापासून साधारण सत्तर किलोमीटरवरील कन्नड तालुक्यातील काळीमठच्या अंबा तांड्या जवळ गौताळा अभयारण्याच्या आत पितळखोरा नावाचा लेणी समूह आहे.
पितळखोरा लेणी समूह पाण्याच्या प्रवाहामुळे दोन भागात विभागला गेला आहे , पुरातत्व विभागाने नव्याने तयार केलेल्या पायर्या उतरून पूर्वीचा लाकडी व आत्ताचा लोखंडी पुला जवळ आल्यानंतर एक वाट जाते पुलावरून उजवीकडील लेणी समूहाकडे ज्या मध्ये नऊ लेण्यांचा समूह आहे तर दुसरी वाट जाते आपल्या डावीकडून चार लेण्यांच्या समूहाकडे.
पितळखोरा लेणी समूहातील हे शेवटचे अपूर्ण पण महत्त्वपूर्ण स्थापत्य , हे स्थापत्य पूर्णत्वास कधी गेले नाही या स्थापत्याचा काळ तज्ञांच्या मते इ स.पूर्व १८० च्या आसपासचे आहे. छोटेसेच आटोपशीर पण महत्त्वपूर्ण तपशिलासह.
पहाडात ओबडधोबड पोखरून निर्माण केल्यासारखे वाटणारे हे स्थापत्य म्हणजे स्तंभ विरहित चैत्य, स्थापत्य विशारदांनी आपल्याला हवी तेवढी जागा साफ करून कातळाला तासून घेत समोरील बाजूस वर दर्शनी भागात चैत्य गवाक्षाच्या समान आकार देऊन चैत्य गवाक्षाच्या बरोबर मधोमध इतर लेणी समूहात दिसून येत नाही असे “वातायनाची” तरतूद इथे करून घेतली आहे, याला “चैत्य वातायन” असे संबोधन आहे, याचा उपयोग आतल्या वास्तूत हवा खेळतील रहावी तसेच नैसर्गिक प्रकाश आत प्रवेश करण्यासाठी याचे प्रामुख्याने प्रयोजन. कलाकाराला कलाकुसर करता यावी म्हणून इथे समतल जागा आहे जिथे एक माणूस सहज उभे राहून आपली कलाकृतीतील निपुणता प्रस्तरात उतरवू शकेल पण तसे होऊ शकले नाही, अशी जागा तुम्हाला जुन्नर मधील मानमोडी लेणी समूहातील अपूर्ण चैत्यगृहातील गाभाऱ्यातील स्तूपावर दिसून येईल तसेच भूत लेणीवरील अपूर्ण चैत्यगृहाच्या बाहेरील बाजूस चैत्य गवाक्षाजवळ आहे.
चार पायर्या वर चढून गेल्यावर या वास्तूत प्रवेश करण्यासाठी दरवाज्याची व्यवस्था केली गेली आहे पण इथे एक बाब लक्षात घेण्यासारखे आहे ती म्हणजे जसे इतर लेणी समूहात दिसून येणाऱ्या दरवाजा बसवण्यासाठी लागणाऱ्या खोबण्या मात्र इथे दिसून येत नाहीत, म्हणजेच इथे कधीच लाकडी दरवाजा बसवण्यात आलेले नव्हता ही वास्तू सदैव दर्शनास खुली होती पण परिसर आजही दाट अरण्याने वेढेलेले असतांना असे करणे धोकादायक ठरू शकेल.
दरवाज्यातून आत प्रवेश केल्यानंतर समोरच एक छोटेखानी स्तूप दिसतो जो सर्वसामान्य माणसाच्या उंची येवढा आहे या स्तूपाला प्रदक्षिणा मारण्यासाठीची जागा सोडण्यात आली आहे पण आत स्तंभ मात्र दिसून येत नाही जे सर्वसामान्यपणे सर्व चैत्यगृहात सर्रासपणे दिसून येतात, या स्तूपाचे वैशिष्ट्ये म्हणजे हा स्तूप वर निमुळता होत गेला आहे अशा स्वरूपाचे स्तूप सहजासहजी दिसून येत नाही, जोत्यापासून ते वेदीकेच्या पट्टीपर्यंत कले कले हा स्तूप वर जात जात निमुळता होत गेला आहे , वेदीकेची पट्टी अत्यंत ठसठशीत स्वरूपात असून वरील अंड गुळगुळीत व सुस्थितीत आहे त्यावरील हर्मिकेची पेटी भग्नावशेषात किंचित प्रमाणात शिल्लक आहे तर हार्मिका मात्र काळओघात नष्ट झाली आहे.
ज्या प्रमाणे स्तूप जसा आतल्या बाजूस निमुळता होत गेलाय तसेच या वास्तूच्या भिंती देखील आतल्या बाजूस निमुळत्या होत गेल्या आहेत ही या वास्तुतील खास बाब आहे , एक गोष्ट इथे नमूद करणे आवश्यक आहे ती म्हणजेच आपल्याला सुरूवातीच्या काळातील भाजे लेणी, बेडेसे लेणी व इतर लेण्यांच्या चैत्यगृहातील स्तंभ जे स्तंभशिर्ष व घट विरहित असायचे ते आतल्या बाजूने कलत्या स्वरूपाचे असायचे इथे मात्र त्या गोष्टीला फाटा देण्यात आला आहे इथे आतल्या बाजूस निमुळत्या होत गेलेल्या भिंती आहेत ज्या छान तासून काढल्या आहेत, भिंती तासण्यासाठी लागणाऱ्या छोट्या स्वरूपाच्या छन्नीचे घाव आज ही स्पष्टपणे भिंतीवर दिसून येत आहेत, निमुळत्या होत गेलेल्या या वास्तुचे छत मात्र नेहमीप्रमाणेच गजपृष्ट आकाराचे आहे.
पितळखोरा लेणीचा शोधकर्ता हेन्री कझींस व त्यानंतर या लेणीवर आपल्या “द केव्ह टेंम्पल ऑफ इंडिया” या ग्रंथातून लिखाण करणारे जेम्स फर्ग्युसन तसेच जेम्स बर्जेस यांना या लेणी बाबत माहिती नाही कारण या लेणीचा शोध त्यांच्या नंतर लागला आहे.
स्वातंत्र्य पूर्व काळात हैदराबादच्या निजामांनी या संपूर्ण लेणी समूहाच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून दिला होता जेव्हा हा भूभागावरून त्यांची सत्ता होती त्यांच्यासाठी गुलाम यझदानी यांनी काम पाहीले होते त्यांच्या सोबतीने पुण्याचे म गो दिक्षीत हे देखील होते.
पुढे स्वातंत्र्यानंतर हा लेणी समूह भारत सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने हा लेणी समूह १९५३ मध्ये संरक्षित स्मारक म्हणून घोषीत करण्यात आला व यावर काही प्रमाणात संवर्धनाचे काम ही झाले पण जी प्रसिद्धी पितळखोरा लेणी समूहाला मिळायला हवी होती ती आजपर्यंत मिळालेली नाही.
लेणी स्थापत्यातील बारकावे समजून घेणे जेवढे सोपे वाटतात तेवढे सोपे नाहीत , विशेषत सुरुवातीच्या काळात निर्माण झालेल्या लेण्या आणि त्यातील बारकावे .
“लयन स्थापत्यकला” ही नव्यानेच भारतीय स्थापत्यकलेला मिळालेली देण आहे या आधी अशी स्थापत्य या भारत भूमीवरून निर्माण झालेली नव्हती हे आपण प्रखरपणे समजून घेणे आवश्यक आहे.
लेणीचे सर्व फोटो याच ऐतिहासिक शहरात राहणारे माझे मित्र अमोल बोर्डे यांनी उपलब्ध करून दिले आहेत त्यांचे मनापासून आभार.
या लेणीवरील माझ्या विडिओची लिंक शेअर करतो ते देखील सर्वांनी आवर्जून पाहा व आपला अभिप्राय नोंदवा : https://youtu.be/QYSTWkBlZ6A?si=RScmpbcUYx6oqbHB
सूरज रतन जगताप ( लेणी अभ्यासक )








