Home सातारा नुकत्याच पार पडलेल्या फलटण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत नव्याने निवडून आलेल्या अध्यक्ष व... 
फलटण : नुकत्याच पार पडलेल्या फलटण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत नव्याने निवडून आलेल्या अध्यक्ष व नगरसेवकांची पहिली सर्वसाधारण सभा गुरुवार (दि. 22) दुपारी 11 वाजता नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.या सभेत उपनगराध्यक्षपदाची निवड, तसेच नामनिर्देशित सदस्य (स्वीकृत नगरसेवक) नियुक्तीची व विविध विषय समितीच्या सभापती व सदस्य निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर हे कामकाज पाहणार आहेत.
उपनगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांनी गुरुवारी सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत मुख्याधिकारी यांच्याकडे नामनिर्देशन अर्ज सादर करायचे आहेत. दुपारी 12 वा.अर्जाची छाननी होणार आहे.गरज भासल्यास तत्काळ मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
नगरपरिषदेमधील पक्ष किंवा गटांच्या संख्याबळानुसार कमाल 3 स्वीकृत नगरसेवक नियुक्त केले जाणार आहेत.यासाठी संबंधित पक्ष,गट व आघाडी प्रमुखांनी मा.जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे बुधवार (दि. 21 ) दुपारी 11 ते 2 वा.पर्यंत अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. त्याच दिवशी अर्जाची अधिकृत छाननी होणार आहे. तसेच दिनांक 22 रोजी फलटण नगरपरिषदेमध्ये पिठासीन अधिकारी यांच्याकडे सदर अर्ज दुपारी 2 वाजेपर्यंत दाखल करायचे आहेत.
उपनगराध्यक्ष पदासाठी नवनियुक्त नगरसेवकांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे.फलटण नगर परिषदेमध्ये नवनिर्वाचित सदस्य भाजप -12 सदस्य, राष्ट्रवादी (अजित पवार गट) 4 सदस्य , शिवसेना (शिंदे गट) 7 सदस्य , राष्ट्रीय काँग्रेस -1 सदस्य, कृष्णा भीमा आघाडी – 1 व अपक्ष – 2 अशी एकूण सदस्य संख्या आहे. उपनगराध्यक्ष कोण होणार, याबाबत शहरात प्रचंड उत्सुकता वाढली आहे.
स्वीकृत नगरसेवकांवर चर्चा
स्वीकृत नगरसेवक पदासाठी अनेक इच्छुक मैदानात उतरल्याने निवडणुकीत थांबलेले व पक्षश्रेष्ठींनी शब्द दिलेले कार्यकर्ते यांची पंचाईत होण्याची शक्यता आहे.पहिली सर्वसाधारण सभा फलटणच्या राजकारणाची पुढील दिशा ठरवणारी असून, उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक कोण होणार याकडे शहराचे लक्ष लागले आहे. दरम्यान सत्ताधारी भाजप आघाडीला दोन तर शिवसेना (शिंदे गट) आघाडीला एक स्वीकृत सदस्य नेमता येणार आहेत