
फलटण :- जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार सौ. वैशाली संदीप कांबळे व पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार सौ. स्वाती हणमंत आटोळे यांच्या प्रचारार्थ हनुमान मंदिर, बरड येथे नारळ फोडून प्रचार शुभारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. धार्मिक व भक्तिमय वातावरणात या प्रचाराची सुरुवात करण्यात आली.
या शुभारंभ कार्यक्रमाला परिसरातील माजी आमदार श्री. दीपक राव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली. हनुमान मंदिरात विधीवत पूजा करून नारळ फोडत प्रचाराची अधिकृत सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार दीपक राव चव्हाण यांनी दोन्ही उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा देत, सर्वसामान्यांच्या विकासासाठी त्या नक्कीच प्रभावी काम करतील, असा विश्वास व्यक्त केला.
आमदार चव्हाण यांनी आपल्या भाषणात जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सक्षम व कार्यक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे नमूद केले. सौ. वैशाली कांबळे व सौ. स्वाती आटोळे या दोन्ही उमेदवार जनतेच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असून विकासाचा ध्यास घेऊन काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी एकजुटीने काम करून दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. संपूर्ण कार्यक्रम शांततेत, शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.








