
ढवळ (ता. फलटण) — दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी त्याग, संघर्ष आणि समर्पणाचे प्रतीक असलेल्या त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त मौजे पंचशील तरुण मित्र मंडळ, ढवळ व भारतीय बौद्ध महासभा, तालुका फलटण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाई यांची जयंती अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सामूहिकरित्या सविनय जयभीमचा जयघोष करत माता रमाई यांना वंदन केले.
या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा, फलटण तालुक्याचे संस्कार सचिव बजरंग गायकवाड प्रमुख उपस्थित होते. त्यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून त्यांनी माता रमाई यांच्या जीवनातील त्याग, सहनशीलता आणि सामाजिक चळवळीत दिलेल्या मोलाच्या योगदानावर सविस्तर प्रकाश टाकला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनात माता रमाई यांनी दिलेला आधार, त्यांची कुटुंबासाठी व समाजासाठी केलेली तपश्चर्या उपस्थितांसमोर उलगडून सांगितली.
यावेळी उपस्थित वक्त्यांनी माता रमाई यांच्या जीवनकार्यावर आपली मनोगते व्यक्त करत सांगितले की, माता रमाई या केवळ बाबासाहेबांच्या सहचारिणी नव्हत्या, तर त्या सामाजिक क्रांतीच्या एक मूक पण भक्कम आधारस्तंभ होत्या. त्यांच्या त्यागातूनच बाबासाहेबांना समाज परिवर्तनाचे महान कार्य साध्य करता आले, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमास पंचशील तरुण मित्र मंडळाचे पदाधिकारी, भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम शांततामय, अनुशासित आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या शेवटी माता रमाई यांच्या विचारांचा व आदर्शांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. अशा प्रकारचे सामाजिक व विचारप्रबोधनात्मक उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.








