साताऱ्यातील  सर्वात मोठी कारवाई; बोगस शिक्षकांची उचलबांगडी, निलंबन व गुन्हे दाखल

0
77
साताऱ्यातील  सर्वात मोठी कारवाई; बोगस शिक्षकांची उचलबांगडी, निलंबन व गुन्हे दाखल

सातारा – राज्यात शिक्षण क्षेत्राला कलंक ठरणाऱ्या बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन बदलीचा लाभ घेणाऱ्या शिक्षकांवर जोरदार कारवाईचा दणका सुरु झाला आहे. यामध्ये आतापर्यंत ३८ शिक्षकांची बदलीच्या लाभातून उचलबांगडी करण्यात आली असून, दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. तर, तीन शिक्षक निलंबित झाले आहेत. विशेष म्हणजे ही कारवाई जिल्हा परिषद साताऱ्यातून सुरु झाल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष येथे केंद्रित झाले आहे.

सीईओ याशनी नागराजन यांच्या कठोर निर्णयांची फलश्रुती

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी बोगस शिक्षकांविरोधात कठोर पावले उचलत राज्यातील सर्वात मोठ्या फेरतपासणी मोहिमेची सुरुवात केली. त्यांच्या आदेशानुसार, सुमारे ५८६ शिक्षकांची वैद्यकीय फेरतपासणी जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केली जात आहे.

  • शारीरिक तपासणीसाठी पाठवले शिक्षक – ३२७
  • तपासणीस उपस्थित – ३००
  • पात्र ठरले – २२५
  • अपात्र ठरले – ६०
  • गैरहजर – २७

यातील ६० शिक्षकांना अपात्र ठरवण्यात आले असून, गैरहजर २७ शिक्षकांना पुन्हा संधी देण्यात येणार आहे. मात्र, पुन्हा गैरहजर राहिल्यास त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई होणार आहे.

बोगस दिव्यांग आणि आजारग्रस्त प्रमाणपत्र धारक उघडे

संवर्ग १ व २ मधून बदलीचा लाभ घेण्यासाठी काही शिक्षकांनी बनावट दिव्यांगत्वाचे किंवा दुर्धर आजाराचे दाखले सादर केल्याचे उघडकीस आले आहे. वैद्यकीय फेरतपासणीत अशा ३८ शिक्षकांना अपात्र ठरवण्यात आले असून, त्यांच्या जागा आता संवर्ग ४ मधील पात्र शिक्षकांसाठी खुल्या करण्यात येत आहेत. विन्सीस आयटी कंपनीमार्फत या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.

पुण्यनगरीचा लढा ठरला निर्णायक

या संपूर्ण गौडबंगालाचा पर्दाफाश करण्याचे महत्त्वाचे कार्य दै. पुण्यनगरीने केले. यामुळेच संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेत कारवाईचा बडगा उचलला. शिक्षणातील बोगसगिरी थांबवण्यासाठी हा लढा प्रेरणादायक ठरत आहे.

पुढील टप्पा:
गैरहजर व अपात्र शिक्षकांवर निलंबन व फौजदारी कारवाईची प्रक्रिया सुरू असून, शिक्षण क्षेत्रात स्वच्छता आणि पारदर्शकता यासाठी ही मोठी पावले मानली जात आहेत.