
फलटण :- सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आज (दि. ७ ऑक्टोबर) पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये फलटण पंचायत समितीचे सभापतीपद ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला’ (OBC महिला) या गटासाठी राखीव जाहीर झाले आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील राजकीय चित्रच बदलले असून, अनेक दिग्गज इच्छुकांचे समीकरणे ढासळले आहेत.
फलटण पंचायत समितीमध्ये यंदा १६ सदस्यांची निवड होणार आहे. सभापतीपदाचे महत्त्व लक्षात घेता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली होती. मात्र, आरक्षणामुळे अनेकांचे स्वप्न अपूर्ण राहिले असून, आता नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील एकूण ११ पंचायत समित्यांसाठी आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली असून, यामुळे जिल्ह्यातील राजकारणाचा वेग आणखी वाढला आहे. पुढील टप्प्यात सदस्यपदासाठीच्या आरक्षणावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.








