
भीमा कोरेगाव लढाई : इतिहास, वास्तव , शौर्य आणि दलित अस्मितेचा निर्णायक टप्पा
साहस टाईम्स :- इतिहास हा केवळ भूतकाळाची नोंद नसतो; तो वर्तमानाला दिशा देतो आणि भविष्याला प्रश्न विचारतो. भीमा कोरेगावची लढाई ही अशीच एक ऐतिहासिक घटना आहे, जी दोनशेहून अधिक वर्षांनंतरही समाजमन अस्वस्थ करते, कारण ती शोषितांच्या शौर्याची, स्वाभिमानाची आणि प्रतिकाराची साक्ष देते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे दिलेल्या ऐतिहासिक भाषणात दलित समाजाला उद्देशून जे शब्द उच्चारले, ते केवळ प्रेरणादायी नव्हते, तर ठोस ऐतिहासिक पुराव्यांवर आधारित होते.
ते म्हणाले होते –
“तुम्ही शुरविरांची संतान आहात ही गोष्ट काल्पनिक नव्हे; तर तुम्ही भिमा कोरेगावला जाऊन बघा. तुमच्या पूर्वजांची नावे तेथे कोरलेली आहेत. तो पुरावा आहे की तुम्ही भेडबकरीची संतान नसून सिंहाचे छावे आहात…”
हे विधान म्हणजे दलित समाजाला दिलेली आत्मसन्मानाची जाणीव तर होतीच, पण त्याचबरोबर इतिहासाला दिलेले थेट आव्हान होते.
भीमा कोरेगावची लढाई आज अनेक कारणांनी पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे. १ जानेवारी २०१८ रोजी घडलेल्या हिंसाचाराला सात वर्षे पूर्ण होत आहेत. हा केवळ दंगलीचा प्रसंग नव्हता, तर दलित अस्मितेवर, इतिहासावर आणि स्मरणपरंपरेवर झालेला जाणीवपूर्वक हल्ला होता. दिनांक १ जानेवारी २०१८ रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटिश सैन्य यांच्यात दिनांक १ जानेवारी १८१८ साली झालेल्या ऐतिहासिक युद्धाला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भीमा कोरेगाव येथे हजारो नागरिक एकत्र जमले होते. हा जमाव कोणत्याही राजकीय षड्यंत्रासाठी नव्हता, तर इतिहासातील एका शौर्यगाथेचे स्मरण करण्यासाठी आणि या लढाईत मृत्युमुखी पडलेल्या शूर वीरांना मानवंदना देण्यासाठी आला होता.
इतिहास स्पष्टपणे सांगतो की, या युद्धात ब्रिटिश सैन्याचा विजय झाला होता. मात्र हा विजय दलित समाजासाठी केवळ ब्रिटिशांचा विजय नव्हता, तर शतकानुशतके अपमान, अन्याय आणि अस्पृश्यतेखाली चिरडल्या गेलेल्या महार समाजाच्या शौर्याचा विजय होता. त्या काळात ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात महार समाजातील मोठ्या संख्येने सैनिक कार्यरत होते. समाजाने ज्यांना अस्पृश्य ठरवले होते, त्याच समाजातील सैनिकांनी रणांगणावर अतुलनीय पराक्रम गाजवला. हीच या लढाईची खरी ताकद आहे.
इतिहास अभ्यासकांच्या मते, दुसरे बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २८ हजार सैनिक पुण्यावर आक्रमणासाठी सज्ज होते. त्यांच्या समोर ईस्ट इंडिया कंपनीची केवळ ८०० सैनिकांची तुकडी उभी होती. या तुकडीत तब्बल ५०० महार सैनिक होते. सुरुवातीला पेशव्यांनी सुमारे ३००० सैनिकांची फौज हल्ल्यासाठी पाठवली होती. फ्रान्सिस स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडिया कंपनीच्या या तुकडीनं तब्बल १२ तास खिंड लढवली. संख्या, शस्त्रास्त्रे आणि सैनिकी ताकद असूनही पेशव्यांच्या सैन्याला विजय मिळवता आला नाही. उलट, जनरल जोसेफ स्मिथ यांच्या नेतृत्वाखालील मोठे सैन्य दाखल होईल, या भीतीने पेशव्यांचे सैन्य रणांगणातून माघार घेऊन पळ काढू लागले. हा इतिहास आहे कल्पना नव्हे. ईस्ट इंडिया कंपनीच्या या तुकडीत भारतीय वंशाचे सैनिक होते आणि त्यातील बहुसंख्य महार समाजाचे होते. हे सर्व सैनिक बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री विभागाशी संलग्न होते. म्हणूनच भीमा कोरेगावची लढाई ही केवळ दोन सैन्यांमधील संघर्ष नसून, दलित चळवळीच्या इतिहासातील एक निर्णायक आणि अभिमानास्पद टप्पा आहे.
ज्यांना इतिहास नाकारायचा आहे, ज्यांना दलितांचा शौर्यगौरव सहन होत नाही, त्यांच्यासाठी भीमा कोरेगाव खुपत राहतो. कारण हा इतिहास सांगतो, दलित हा केवळ अन्याय सहन करणारा नाही, तर रणांगण जिंकणारा सिंह आहे. त्यामुळे मनुवादी, सनातनी प्रवृत्ती या लढाईवर वारंवार प्रश्नचिन्ह उभे करतात. अॅड. रोहन जमादार माळवदकर यांसारख्या हस्तकांमार्फत या लढाईचे सत्य दडपून चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र त्यांच्या खोट्या इतिहासाची आंबेडकरी, पुरोगामी लेखक, इतिहासकार आणि संशोधकांनी अनेकदा पोलखोल केली आहे. काही जण ही लढाई “लढाई नव्हे, तर केवळ चकमक होती” असे सांगतात. परंतु हा दावा पूर्णतः खोटा आहे. या लढाईची तुलना थर्मापीलीच्या युद्धाशी (इ.स.पू.४८०) केली जाते. ज्या प्रमाणे ग्रीससाठी थर्मापीलीचे युद्ध अभिमानाचे प्रतीक आहे, त्याचप्रमाणे बहुजन समाजासाठी भीमा कोरेगावचा संग्राम आहे.
दिनांक २६ मार्च १८२१ रोजी भीमा कोरेगाव येथे उभारण्यात आलेल्या जयस्तंभाची झाली. या जयस्तंभाचा डिझाइन कॅप्टन नट याने केला होता. तो म्हणतो –
“उपस्थित मान्यवरहो, कोरेगाव येथे झालेली लढाई ही इतिहासातील सर्वात चमकदार लष्करी कामगिरींपैकी एक आहे. पूर्वेकडील राष्ट्रांच्या इतिहासातील ही अत्यंत महान कामगिरी आहे. हा संघर्ष साधा नव्हता, तर रोमन व ग्रीक साम्राज्यांच्या लढायांच्या तोडीचा होता.”
५ नोव्हेंबर १९२५ रोजी मुंबई कौन्सिलमध्ये भाषण करताना कमिशनर मि. एल. जे. माऊंटफोर्ड यांनी स्पष्टपणे सांगितले की, जॉन कंपनीच्या सैन्यात महार सैनिकांचा मोठा भरणा होता आणि कोरेगावचा विजयस्तंभ हा महारांनी गाजविलेल्या पराक्रमाचे प्रतीक आहे.
खडकीची लढाई, येरवड्याची लढाई, भीमा-कोरेगाव ची लढाई, आष्टीची लढाई हा पेशवाईचा अंत होता. छत्रपती प्रतापसिंह भोसले महाराजांची सुटका, महार रेजिमेंटची स्थापना आणि तिचे शौर्य हे सर्व भीमा कोरेगावच्या युद्धाशी थेट जोडलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महारांना लष्करात प्रवेश मिळावा यासाठी केलेली चळवळ, महार बटालियनची स्थापना आणि महार रेजिमेंटच्या बॅजवर कोरेगावचा विजयस्तंभ हे सर्व या इतिहासाची साक्ष देते आहे. म्हणूनच भीमा कोरेगावच्या लढाईविषयी घेतले जाणारे आक्षेप जसे महारांचा या लढाईशी काहीही संबंध नाही, ही लढाई जातीअंतासाठी नव्हती, ही केवळ चकमक होती, संभाजी महाराजांना दिलेली शिक्षा शरियत कायद्यानुसार होती. हे सर्व आक्षेप ऐतिहासिक पुराव्यांच्या कसोटीवर टिकत नाहीत.
ही लढाई महार सैनिकांनी केवळ ब्रिटिशांच्या बाजूने लढली म्हणून महत्त्वाची नव्हती; ती होती जातीयतेविरुद्ध, अन्यायाविरुद्ध आणि अमानवी व्यवस्थेविरुद्ध उभारलेली ऐतिहासिक बंडखोरी. गळ्यातील काळा दोरा, थुंकीसाठी गळ्यातील मडके आणि कमरेचा खराटा या अपमानाच्या चिन्हांवर मिळवलेला हा विजय होता.
ही लढाई होती माणुसकीची, अन्याय आणि अत्याचाराला वाचा फोडणारी; ही लढाई होती स्वाभिमानाची. वास्तविक पाहता, ही लढाई होती मानवमुक्तीची!
आयु.सोमीनाथ पोपट घोरपडे,संस्कार सचिव
भारतीय बौध्द महासभा शाखा सातारा जिल्हा(पूर्व)
मो.नं. 9284658690








