साताऱ्यात ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा भव्य समारोप | शासनाकडून ३ कोटींचा निधी, पुढेही मदतीची ग्वाही

0
49
साताऱ्यात ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा भव्य समारोप | शासनाकडून ३ कोटींचा निधी, पुढेही मदतीची ग्वाही

मराठी ही केवळ संवादाची नव्हे, तर रोजगाराची भाषा व्हावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा : मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीचा आत्मा, अस्मिता आणि अभिमान आहे. मराठी टिकली तरच आपले अस्तित्व टिकेल, याची जाणीव प्रत्येक मराठी माणसाने ठेवली पाहिजे. मराठी ही केवळ संवादापुरती मर्यादित न राहता अर्थार्जन व रोजगाराची भाषा झाली पाहिजे, असे ठाम प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सातारा येथे झालेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठी भाषेचे वैभव, दरारा आणि दिमाख जपणे हे केवळ कर्तव्य नसून पवित्र जबाबदारी आहे. या साहित्य संमेलनासाठी शासनाने ३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, भविष्यातही अशा संमेलनांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मराठी साहित्याचा ‘महाकुंभ’ साताऱ्यात
१ ते ४ जानेवारीदरम्यान सातारा येथे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. समारोप कार्यक्रमास ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित ज्येष्ठ साहित्यिक रघुवीर चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री व स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पायाभरणी झालेल्या साताऱ्याच्या पवित्र भूमीत हे संमेलन होणे ही अभिमानाची बाब असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “हे संमेलन केवळ साहित्यिक कार्यक्रम नसून मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा, सांस्कृतिक आत्मविश्वासाचा आणि विचारस्वातंत्र्याचा उत्सव आहे. मराठी भाषेच्या सर्व प्रवाहांचा हा संगम आहे.”
हिंदी भाषेची सक्ती नाही – मराठीला प्राधान्य
महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती अजीबात होणार नाही, असा ठाम शब्द उपमुख्यमंत्र्यांनी दिला. मराठी भाषेचा सन्मान वाढवण्यासाठी राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांच्या आवारात मराठी ललित पुस्तकांच्या विक्रीसाठी ५० टक्के सवलतीचे स्टॉल उपलब्ध करून दिले जातील. लेखन व प्रकाशन व्यवसायावरील कर कमी करण्यासाठीही प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
शंभराव्या संमेलनासाठी मोठे निर्णय
मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, येणारे शंभरावे साहित्य संमेलन ऐतिहासिक ठरेल. यानिमित्ताने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शंभर संमेलनाध्यक्षांसाठी ग. दि. माडगूळकर यांच्या नावाने सन्मान निधी देण्यात येईल, तर पुढील संमेलनाध्यक्षांसाठी महादजी शिंदे यांच्या नावाने सन्मान निधी दिला जाईल. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे स्मारक सातारा येथे उभारण्यासाठी एमआयडीसीत दीड एकर जमीन देण्यात येणार आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने अनुवाद समिती पुन्हा सुरू करण्यात येणार असून, ग्रामीण साहित्याचे विविध भाषांमध्ये भाषांतर करून प्रकाशनासाठी शासन निधी उपलब्ध करून देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुण्यातील साहित्य परिषदेच्या इमारतीसाठी १ कोटी रुपयांचा निधी देण्याचे पत्रही यावेळी प्रदान करण्यात आले.
संमेलन साताऱ्याच्या वैभवात भर घालणारे – विश्वास पाटील
संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले की, हे संमेलन साताऱ्याच्या वैभवात भर टाकणारे ठरले. मराठी भाषेतील रसग्रहण, अलंकार आणि विनोद नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सोशल मीडियामुळे वाढणारी असहिष्णुता चिंताजनक असल्याचे सांगत, मराठी भाषेच्या सांस्कृतिक अस्तित्वासाठी लढा सुरूच राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शंभरावे संमेलन पुण्यात
भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले की, शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात होणार असून, पहिले संमेलनही पुण्यातच झाले होते. त्यामुळे एक ऐतिहासिक वर्तुळ पूर्ण होणार आहे. या निमित्ताने दुबईतही विशेष साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
समारोप कार्यक्रमात संमेलनाला मोलाची मदत करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी केले, सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले, तर विविध ठराव सुनिताराजे पवार यांनी मांडले.