Wednesday, October 14, 2026
HomeUncategorizedमुधोजी महाविद्यालयात १७ ऑक्टोबरला इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन व राष्ट्रीय...

मुधोजी महाविद्यालयात १७ ऑक्टोबरला इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन व राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

‘२० व्या शतकातील संस्थाने : फलटण संस्थानचा विशेष संदर्भ’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र; डॉ. आ. ह. साळुंखे यांना राजर्षी छत्रपती शाहू इतिहास संशोधक व लेखक पुरस्कार

फलटण : सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा इतिहास संशोधन मंडळाचे १७ वे वार्षिक अधिवेशन व राष्ट्रीय परिषद शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी मुधोजी महाविद्यालयातील प्राचार्य शिवाजीराव भोसले सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. ‘२० व्या शतकातील संस्थाने : फलटण संस्थानचा विशेष संदर्भ’ हा या राष्ट्रीय परिषदेचा मुख्य विषय आहे.

परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार असून, फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे अध्यक्षस्थानी असतील. सातारा येथील प्राचार्य डॉ. विजयराव नलावडे हे बीजभाषण करणार आहेत. या वेळी फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे पदाधिकारी, सातारा इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. चंद्रवदन नाईक यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

इतिहास संशोधन व लेखन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. आ. ह. साळुंखे यांना सातारा इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने ‘राजर्षी छत्रपती शाहू इतिहास संशोधक व लेखक पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.

फलटण संस्थानाला महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याशी फलटणच्या नाईक-निंबाळकर घराण्याचे ऐतिहासिक संबंध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजी दीपाबाई आणि प्रथम पत्नी सईबाई या नाईक-निंबाळकर घराण्यातील होत्या. या घराण्याचा ऐतिहासिक वारसा, संस्थानकालीन प्रशासन, तत्कालीन राजकीय घडामोडी आणि स्वातंत्र्यानंतर भारतात संस्थानाच्या विलीनीकरणाची प्रक्रिया या विषयांचा अभ्यास या परिषदेच्या माध्यमातून होणार आहे.

परिषदेच्या कार्यक्रमात सकाळी ९ ते १० या वेळेत नावनोंदणी व अल्पोपाहार, सकाळी १० ते १०.३० उद्घाटन समारंभ, १०.३० ते ११.३० बीजभाषण, त्यानंतर शोधनिबंध वाचनाचे सत्र आयोजित करण्यात आले आहे. दुपारी भोजनानंतर २.३० ते ४ या वेळेत शोधनिबंध वाचनाचे पुढील सत्र होईल. सायंकाळी ४ वाजता समारोप समारंभ होणार असून, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील इतिहास विभागप्रमुख डॉ. अवनीश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या राष्ट्रीय परिषदेमुळे विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, संशोधक, इतिहास अभ्यासक आणि विद्यार्थ्यांना संशोधनपर विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळणार आहे. फलटण संस्थानाच्या ऐतिहासिक वारशाचे दस्तऐवजीकरण, स्थानिक इतिहासाचा चिकित्सक अभ्यास आणि इतिहास संशोधनाला चालना देण्याच्या दृष्टीने हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या अधिवेशनाविषयी माहिती देताना संयोजक डॉ. ए. एस. टिके, समन्वयक प्रा. (डॉ.) एस. टी. कदम आणि प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी सांगितले की, या राष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून फलटण संस्थानाच्या ऐतिहासिक वारशाला संशोधनाच्या व्यासपीठावर आणण्याचा आणि इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये संशोधनात्मक दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्न आहे. इतिहासप्रेमी, संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी या परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

— मुधोजी महाविद्यालय, फलटण

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments