फलटण :- फलटण तालुक्यातील प्रसिद्ध धुमाळवाडी धबधबा हे ठिकाण पर्यटनासाठी ओळखले जाते. मात्र, ८ जुलै रोजी संध्याकाळी येथे फिरायला आलेल्या पर्यटकांवर घातपात घडवून लुटमार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या गुन्ह्यात १० जणांच्या टोळीने महिलांना लक्ष्य करून शस्त्राचा धाक दाखवून ५४,५०० रुपयांचा ऐवज लुटून नेला.
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने जलद कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून उर्वरित सात जण फरार आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पर्यटक धबधब्यापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर असताना वारुगड टेकडीवरुन टेहाळणी करणाऱ्या टोळीने अचानक हल्ला चढवून, लाकडी दांडके व लोखंडी सुरे दाखवून महिलांच्या गळ्यातील सोन्याचांदीचे दागिने आणि पुरुषांकडील घड्याळ व रोकड जबरदस्तीने हिसकावून घेतली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पिडितांच्या अपूर्ण वर्णनावरून पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम राबवून खालील आरोपींना अटक केली:
- दिपक नामदेव मसुगडे (वय ३०, नवलेवाडी, माण, सातारा)
- विलास उर्फ बाबु दत्तात्रय गुजले (वय २१, खांडज, बारामती, पुणे)
- चेतन शंकर लांडगे (वय २५, सोनगाव बंगला, फलटण)
तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून गुन्ह्यात वापरलेला चाकू व बजाज पल्सर मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे.
या गुन्ह्यात सहभागी असलेले उर्वरित आरोपी पुढीलप्रमाणे आहेत:
- रणजित कैलास भंडलकर
- तानाजी नाथाबा लोखंडे (खामगाव, फलटण)
- अक्षय महादेव चव्हाण (शिरवली, बारामती)
- वैभव सतिश जाधव
- रामा शंकर जाधव
- सुरज कैलास जाधव (मलवडी, माण)
- एक अल्पवयीन मुलगा
हे सर्व संशयित सराईत गुन्हेगार असून यांच्यावर पूर्वीही दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, मारामारी, व विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत.
ही संपूर्ण कार्यवाही पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये दहिवडी पोलिसांचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि इतर पोलीस कर्मचारी—वैभव सूर्यवंशी, नितीन चतुरे, अमोल जगदाळे, हणमंत दडस, तुषार नलवडे, कल्पेश काशिद, नितीन धुमाळ, निलेश कुदळे, अक्षय खाडे—यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक करत आहेत.