फलटण (साहस Times) | “मला शिव्या घाला की सूर्याला धरा, मी तुम्हाला एकही अर्वाच्य शब्द वापरणार नाही,” अशा शब्दांत माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर परखड टीका केली.
कोळकी (ता. फलटण) येथे नुकत्याच पार पडलेल्या सभेत आमदार रामराजे यांनी माजी खासदार रणजितसिंह यांच्या वाय प्लस सुरक्षेवर सवाल उपस्थित केला होता. यावर प्रत्युत्तर देताना रणजितसिंह यांनी स्पष्ट शब्दांत विरोधकांवर हल्लाबोल केला.
“मी फलटण तालुक्याला जिल्हा करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तरुणांच्या हाताला काम मिळावं म्हणून कोट्यवधी रुपयांचा निधी केंद्र व राज्य सरकारकडून आणला. नवीन कालवे, राष्ट्रीय व राज्य महामार्ग, तसेच इतर सुविधा घेऊन फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असे त्यांनी नमूद केले.
“पण विरोधक विकासावर न बोलता माझ्यावर वैयक्तिक टीका करत आहेत. त्यांच्या काळात विकासाचा अजिबात विचार झाला नाही. आज मी तालुक्याला पुढे नेत असताना, हे लोक प्रत्येक कामात अडथळा आणत आहेत. त्यांना विकास खुपतोय,” असा आरोप करत त्यांनी विरोधकांना उद्देशून तीव्र शब्दांत टोले लगावले.