महसूल विभागाचा मूक सेवाभाव – फलटण महसूल विभाग साजरा करतो १ ऑगस्ट महसूल दिन

0
5
महसूल विभागाचा मूक सेवाभाव – फलटण महसूल विभाग साजरा करतो १ ऑगस्ट महसूल दिन

फलटण, १ ऑगस्ट २०२५ ( साहस Times ) :- राज्याच्या प्रशासनात आधारस्तंभ मानला जाणारा महसूल विभाग दरवर्षी १ ऑगस्ट रोजी आपला ‘महसूल दिन’ साजरा करतो. या निमित्ताने महसूल अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यपरायणतेचा गौरव केला जातो. फक्त शेतसाऱ्याची वसुली एवढ्यापुरता मर्यादित नसलेला महसूल विभाग, राज्यातील कायदा-सुव्यवस्था, जमिनीचे हक्क, विविध प्रमाणपत्रांचा निर्गम आणि आपत्ती व्यवस्थापन यामध्येही मोलाची भूमिका बजावतो.

फलटण तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव अहिवळे यांनी सांगितले की, महसूल विभागाचे कार्यक्षेत्र हे अत्यंत व्यापक असून नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारात विभागाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव आहे.

महसूल दिनापासून सुरू होणाऱ्या महसूल सप्ताहात राज्यभर विविध उपक्रम, शिबिरे, महसूल अदालत यांचे आयोजन केले जाते. महसूल विभाग फक्त शेती नोंदीसाठीच नाही तर अवैध खनिज वाहतूक प्रतिबंध, करमणूक कराची वसुली, शस्त्र व अकृषिक परवाने, आणि जमिनीच्या हक्क नियंत्रण या सर्व बाबींसाठीही जबाबदार असतो.

कोविड-१९ महामारीच्या काळात महसूल विभागाने आरोग्य व पोलीस विभागासोबत समन्वयाने काम करत कोविड केअर सेंटर उभारणी, जनजागृती, व तांदळ वाटप यासारखी महत्त्वाची कामगिरी बजावली. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत अनेक गरजूंना मदतीचा हात दिला.

सातबारा संगणकीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी ही महसूल कर्मचाऱ्यांच्या परिश्रमातून शक्य झाली असून यामुळे शेतकऱ्यांना माहिती सुलभतेने उपलब्ध होत आहे. महसूल विभाग शेतकरी आत्महत्यांवरील अहवालापासून ते निवडणुका, सरकारी योजना व मदतवाटपापर्यंतच्या सर्व क्षेत्रात कार्यरत आहे.

फलटण उपविभागातील तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी आणि कर्मचारी यांचा कार्यसमूह आपल्या प्रामाणिक सेवाभावाने विभागाचा सन्मान राखत आहे. महसूल विभागाला फारसे प्रकाशझोतात येत नसले तरी त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडत लोकसेवेसाठी वचनबद्ध राहण्याची भूमिका कायम ठेवली आहे.

लक्ष्मण सुभाष अहिवळे यांनी सांगितले की, महसूल दिन हा दिवस महसूल कर्मचाऱ्यांच्या समर्पणाचे स्मरण करतो आणि राज्यातील सामाजिक व कायदा सुव्यवस्थेतील विभागाच्या योगदानाचा सन्मान करणारा दिवस ठरतो.


📰 साहस Times
आपल्या समाजाचे, आपल्या विकासाचे प्रतिबिंब.