धक्कादायक! हायवा ट्रकच्या अपघातानंतर २४ तासांत आचार्य कुटुंबातील चौघांचा मृत्यू; बारामती हादरली

0
8
धक्कादायक! हायवा ट्रकच्या अपघातानंतर २४ तासांत आचार्य कुटुंबातील चौघांचा मृत्यू; बारामती हादरली

बारामती :- बारामती शहरातील खंडोबानगर येथील महात्मा फुले चौकात रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने एकाचवेळी वडील आणि दोन चिमुकल्यांचा जीव गेला. भरधाव हायवा ट्रकने दिलेल्या धडकेत ओंकार राजेंद्र आचार्य, त्यांची १० वर्षांची मुलगी सई ओंकार आचार्य आणि ४ वर्षांची मधुरा ओंकार आचार्य यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण बारामती हादरली होती.

मात्र, या आघाताचे दुःख सहन न झाल्यामुळे आज (सोमवार) पहाटे ओंकार यांचे वडील आणि निवृत्त शिक्षक राजेंद्र श्रीनिवास आचार्य (वय ७०) यांचंही दुःखद निधन झालं. ते गेले काही दिवस आजारी होते आणि दोनच दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयातून त्यांना घरी सोडण्यात आले होते.

एकाच कुटुंबातील चार जणांचा अवघ्या २४ तासांत मृत्यू झाल्याने बारामती शहरासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. राजेंद्र आचार्य हे इंदापूर तालुक्यातील सणसर परिसरात शिक्षक म्हणून अनेक वर्षे कार्यरत होते. त्यामुळे ते स्थानिकांमध्ये चांगले परिचित होते. त्यांच्या अकस्मात निधनाने सणसर आणि बारामतीत हळहळ व्यक्त होत आहे.