
बारामती | साहस Times प्रतिनिधी :- बँकिंग क्षेत्रात कामाच्या तणावाचा आणखी एक बळी गेला असून, बारामती शहरातील बँक ऑफ बडोदा शाखेचे व्यवस्थापक शिवशंकर मित्रा (वय ४५) यांनी बँकेतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी मध्यरात्री त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. या घटनेनंतर बारामती परिसरात विशेषतः बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी स्पष्टपणे आत्महत्येचं कारण नमूद केलं आहे – कामाचा असह्य ताण आणि वरिष्ठांचा मानसिक दबाव. “सर्व कर्मचारी आपली जबाबदारी समजून घेतात आणि १०० टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कृपया त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा भार टाकू नये,” अशी मार्मिक विनंतीही त्यांनी चिठ्ठीद्वारे केली आहे.
ते पुढे लिहितात, “आत्महत्येचा निर्णय मी पूर्ण शुद्धीत आणि स्वतःच्या इच्छेने घेत आहे. यासाठी माझ्या कुटुंबातील कुणीही जबाबदार नाही.” पत्नी प्रिया आणि मुलगी माही यांची माफी मागत, “माझ्या मृत्यूनंतर डोळ्यांचे दान करावं,” अशी शेवटची इच्छा देखील त्यांनी नमूद केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून शिवशंकर मित्रा अत्यंत तणावात होते. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा केला होता. मात्र, कामाचा ताण दिवसेंदिवस वाढतच गेला आणि अखेर त्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला.
या घटनेनंतर बँकिंग क्षेत्रातील कर्मचारी तसेच नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.







