
साहस Times फलटण :- फलटण नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून प्रभाग क्रमांक १२ मध्ये शिवसेना पक्ष आणि राजेगटाच्या वतीने दत्तनगर येथे कोपरा सभा झाली. या सभेला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, नगरसेवक उमेदवार विकास वसंतराव काकडे आणि स्मिता शहा उपस्थित होते. तसेच माजी आमदार दीपक चव्हाण आणि जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमुळे सभा उत्साही झाली.
सभेच्या सुरुवातीला विकास काकडे यांनी सांगितले की, प्रभागातील कोणत्याही कामासाठी ते नेहमी तयार राहतील. प्रभागातील लोक मेहनत करून आपले जीवन जगतात, म्हणून प्रशासनातील आवश्यक दाखले लोकांच्या घरी जाऊन देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. रस्ते, पाणी आणि स्वच्छतेची कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर देणार असल्याचेही ते म्हणाले.
माजी आमदार दीपक चव्हाण म्हणाले की, श्रीमंत रामराजेंनी फलटण तालुक्याचा विकास घडवला आहे. फलटण हे सुसंस्कृत शहर असून त्याच्या प्रगतीसाठी आम्ही सर्वजण शिवसेनेत आलो आहोत. येथे निर्माण झालेली दहशत संपवणे हे आमचे पहिले ध्येय आहे. शिवसेनेचे उमेदवार सुशिक्षित आणि तरुण असल्याने शहराचा विकास वेगाने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यानंतर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, रामराजेंनी फलटणला दिलेले शांततेचे वातावरण बिघडू नये. शहर आणि तालुका योग्य मार्गाने पुढे जावा म्हणून आम्ही शिवसेनेत आलो आहोत. नगराध्यक्ष पदासाठी श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर हेच योग्य उमेदवार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फलटणमध्ये पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवणार नाही आणि उद्योगांसाठी लागणारी कामे केली जातील, असेही त्यांनी सांगितले. ताकदीने निवडणूक लढवून जास्तीत जास्त मताधिक्याने विजय मिळवण्याचे आवाहन त्यांनी केले.








