सातारा :-सातारा जिल्ह्यातील महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटामध्ये मंत्री पदासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, मकरंद पाटील, आणि महेश शिंदे यांची मंत्रीपदासाठी नावे चर्चेत आहेत. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, आणि नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाचे नेतृत्व मंत्रीपदासाठी अंतिम निर्णय घेईल, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.
उदयनराजेंची किंगमेकरची भूमिका
महाविकास आघाडीचा पराभव करण्यासाठी खासदार उदयनराजेंनी महत्त्वाची भूमिका बजावली. कराड उत्तर आणि कोरेगाव मतदारसंघात भाजप उमेदवारांच्या विजयामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. याशिवाय, लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सोबत एकत्रितपणे भाजपच्या प्रचाराला बळकटी दिली. त्यामुळे पक्षांतर्गत एकता मजबूत झाली असून आगामी निवडणुकांसाठी या दोघांची जोडी महत्त्वाची ठरणार आहे.
शिंदे गटातील हालचाली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरेगाव आणि पाटण या मतदारसंघांमध्ये घवघवीत यश मिळवून मंत्रीपदासाठी शंभूराजे देसाई आणि महेश शिंदे यांची नावे पुढे केली आहेत. विशेषतः शंभूराजेंना ठाणे पालकमंत्री पदाची जबाबदारी पुन्हा मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
रामराजे आणि रणजितसिंह यांचा संघर्ष
फलटण मतदारसंघात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सचिन पाटील यांना विजय मिळवून दिला. यामध्ये जयकुमार गोरे यांचा महत्त्वाचा वाटा होता. लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह यांचा पराभव झाला होता, परंतु विधानसभा निवडणुकीत त्यांनी तो वचपा काढला. रामराजे नाईक निंबाळकर आणि फडणवीस यांच्यातील मतभेद ही जिल्ह्याच्या राजकारणातील चर्चेचा विषय ठरला आहे.
मंत्रीपदासाठी जिल्ह्याचे गणित
जिल्ह्यात मंत्रीपदासाठी चार आमदारांची नावे चर्चेत आहेत. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन शिवरायांच्या गादीचा सन्मान करावा, अशी मागणी समर्थकांनी केली आहे. जयकुमार गोरे आणि महेश शिंदे यांच्या आक्रमक नेतृत्वामुळे त्यांना महत्त्वपूर्ण जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. मकरंद पाटील यांना राष्ट्रवादीच्या वतीने संधी मिळण्याची शक्यता आहे.
पक्ष नेतृत्वाची कसोटी
सातारा जिल्ह्यातील चार आमदारांना मंत्रीपद देताना पक्षाला मोठा तोल सांभाळावा लागेल. निवडणुकीच्या प्रचारात नेत्यांनी दिलेले शब्द पाळणे आणि मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण करणे ही पक्षासाठी मोठी जबाबदारी आहे.