सह्याद्री कदम अजित पवार गटात दाखल; शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह ; शक्तीप्रदर्शन‘खासदार गटा’चे पारडे जड, शरद पवार गटाला मोठा धक्का

0
24
सह्याद्री कदम अजित पवार गटात दाखल; शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह ; शक्तीप्रदर्शन‘खासदार गटा’चे पारडे जड, शरद पवार गटाला मोठा धक्का


फलटण प्रतिनिधी :- फलटण तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाली आहे. जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि युवा नेते सह्याद्री कदम यांनी अखेर आपली राजकीय भूमिका स्पष्ट करत ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ गटाला रामराम ठोकला असून, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
फलटण तालुक्याचे माजी आमदार आणि दिग्गज नेते स्वर्गीय चिमणराव कदम यांचे सुपुत्र असलेल्या सह्याद्री कदम यांच्या या निर्णयामुळे तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सातारा येथे पार पडलेल्या भव्य प्रवेश सोहळ्याने जिल्ह्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले.
हा प्रवेश सोहळा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी राज्यसभा खासदार नितीनकाका पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, जिल्हा बँकेचे संचालक व फलटण तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्यासह महायुतीतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फलटण ते सातारा : शक्तीप्रदर्शनाचा धुरळा
या प्रवेशासाठी सह्याद्री कदम यांनी फलटण तालुक्यातून शेकडो समर्थकांची जमवाजमव केली होती. शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह साताऱ्याकडे कूच करत समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. फलटण ते सातारा मार्गावर आणि सातारा शहरात या शक्तीप्रदर्शनाने परिसर दणाणून गेला.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठे राजकीय समीकरण
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तोंडावर असताना सह्याद्री कदम यांचा हा प्रवेश शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे भाजप–राष्ट्रवादी (अजित पवार गट) महायुती, म्हणजेच ‘खासदार गटा’चे पारडे अधिक जड झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. या नव्या राजकीय समीकरणाचा आगामी निवडणुकांमध्ये महायुतीला मोठा फायदा होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.