फलटण प्रतिनिधी –स्वच्छतेच्या राष्ट्रीय स्पर्धेत कराड शहराला गौरव मिळवून देणारे, अनुभवी आरोग्य निरीक्षक मुकेश विनायक अहिवळे यांनी आता फलटण नगर परिषदेत आरोग्य निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या पुनरागमनाने स्थानिक स्वच्छता मोहिमांना नवे बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अहिवळे यांनी यापूर्वी कराड नगरपरिषदेत स्वच्छता निरीक्षक म्हणून कार्यरत असताना, केंद्र सरकारतर्फे आयोजित स्वच्छ सर्वेक्षण 2024 स्पर्धेत, पश्चिम विभागात ५० हजार ते १ लाख लोकसंख्येच्या गटात कराडला द्वितीय क्रमांक मिळवून दिला होता. याबद्दलचा सन्मान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्ली येथील विज्ञान भवन येथे पार पडलेल्या सोहळ्यात देण्यात आला. यावेळी नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ, कराड पालिका मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर आणि मुकेश अहिवळे उपस्थित होते.
मूळचे फलटण येथील असलेले अहिवळे यांनी फलटण नगर परिषदेतूनच आपल्या प्रशासकीय सेवेला सुरुवात केली होती. सेवाबढतीनंतर त्यांची कराड येथे बदली झाली होती. आता विशेष बदलीने ते पुन्हा आपल्या मूळ गावी फलटणमध्ये आरोग्य निरीक्षक म्हणून नियुक्त झाले आहेत.
त्यांच्या अनुभवाचा फायदा फलटण शहराच्या स्वच्छता अभियानास निश्चितच होईल, असा विश्वास नगर परिषद वर्तुळात व्यक्त होत आहे.