
फलटण : बारामती तालुक्यातील एका अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार करून तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या फलटण येथील २४ वर्षीय तरुणाविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात ‘पोक्सो’ कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव गौरव आदेश निंबाळकर (रा. फलटण, जि. सातारा) असे आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०१९ ते मे २०२५ या काळात आरोपीने फलटण व करंजेपुल (ता. बारामती, जि. पुणे) येथील विविध ठिकाणी तसेच लॉजमध्ये पीडितेच्या इच्छेविरुद्ध वारंवार शरीरसंबंध केले. पीडिता दहावीला शिक्षण घेत असताना आरोपीशी तिची ओळख झाली. त्यानंतर जबरदस्ती, धमक्या आणि ब्लॅकमेल करून अत्याचार सुरू राहिले. आरोपीने उघडे फोटो व व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. ७ ऑगस्ट २०२५ रोजीही आरोपीने करंजेपुल येथे जाऊन पीडितेला लॉजवर येण्यास नकार दिल्याने तिच्यावर मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.








