फलटण : फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक आणि उद्योजक भरत दत्ताजीराव बेडके आणि त्यांचे चिरंजीव अजिंक्य बेडके यांनी काही दिवसांपूर्वी राजे गट प्रणित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. मात्र आज सकाळी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आणि आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतल्यानंतर, त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भरत बेडके यांनी राष्ट्रवादीत पुनर्प्रवेश करत स्वगृही परतल्याचा आनंद व्यक्त केला. यावेळी माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, माजी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष जयकुमार इंगळे, सातारा जिल्हा खो-खो अॅम्युचर असोसिएशनचे उपाध्यक्ष दादासाहेब चोरमले आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
भरत बेडके यांनी पक्षाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेऊन आगामी राजकीय वाटचालीत योगदान देण्याचे आश्वासन दिले आहे.