
रवी जाधव यांनी मुंबईच्या प्रसिद्ध जेजे स्कूल ऑफ आर्ट्समधून व्हिज्युअल कम्युनिकेशन आणि ग्राफिक डिझायनिंगचे शिक्षण घेतले होते. यानंतर त्यांनी आपल्या कामाची सुरुवात एका जाहिरात कंपनीत नोकरी करून केली. या जाहिरात कंपनीत ते कॉपीरायटर आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम पाहत होते. कलेची आवड त्यांना लहानपणापासूनच होती. त्यांचा जन्म वरळीचा… तर, वडील मिल कामगार. यामुळे त्यांच्या आजूबाजूला कलात्मक वातावरण होतच. लहानपणी दादा कोंडके यांचे चित्रपट, मच्छिंद्र कांबळी यांची नाटकं बघूनच ते मोठे झाले. मात्र, जेव्हा स्वतः रवी जाधव यांनी जेजे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेण्याचा विचार केला, तेव्हा त्यांना घरून काहीसा विरोधही झाला होता.








