फलटण :- माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आगामी फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी जोमाने तयारीला लागले असून, आता स्थानिक स्वराज्य संस्थांवरील नियंत्रण मिळवण्यासाठी महायुतीकडून व्यापक रणनीती आखली जात आहे. नगरपालिकेच्या रखडलेल्या निवडणुकांचा कालबद्ध कार्यक्रम नुकताच जाहीर झाला असून, त्यानुसार रणजितदादा यांनी पक्ष कार्यकर्त्यांसह नव्याने हालचाली सुरू केल्या आहेत.
लोकसभेतील पराभवानंतर केवळ काही महिन्यांतच विधानसभेची निवडणूक जोमाने लढवत त्यांनी राजे गटाच्या तीस वर्षांच्या सत्तेला मोठा धक्का दिला आणि महायुतीच्या माध्यमातून सचिन सुधाकर पाटील यांना यशस्वीपणे विधानसभेत पाठवले. हे यश म्हणजे राजकीय पुनरागमनाचे ठोस उदाहरण ठरले आहे.
खासदार असताना माढा लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांमध्ये लक्ष द्यावे लागत असल्याने फलटण-कोरेगाव मतदारसंघाला कमी वेळ देता आला, मात्र आता पूर्ण लक्ष फक्त फलटण तालुक्याच्या प्रलंबित कामांवर केंद्रित असून, विकासाच्या मुद्द्यावर टीकाटिप्पणी टाळत ते स्थिरपणे वाटचाल करत आहेत.
दुसरीकडे, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतून विधानपरिषद सदस्य आहेत, तर त्यांचे बंधू संजीवराजे आणि रघुनाथराजे यांनी पवार साहेबांच्या गटात प्रवेश करत विधानसभा निवडणुकीत माजी आमदार दिपक चव्हाण यांच्यासाठी प्रचार केला होता.
मात्र, निवडणुकीनंतर राजे गटाची भूमिका अद्याप अस्पष्ट असून, आगामी स्थानिक निवडणुकीत ते कुणाच्या सोबत असतील, यावर तालुक्याचे राजकीय समीकरण ठरणार आहे. जनतेचे लक्ष आता त्यांच्याकडील निर्णयावर आहे.