फलटण तालुक्यावर पावसाचं संकट, एनडीआरएफ तुकडीला पाचारण

0
7
फलटण तालुक्यावर पावसाचं संकट, एनडीआरएफ तुकडीला पाचारण

फलटण :- फलटण तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अविरत मुसळधार पावसामुळे संपूर्ण ग्रामीण आणि शहरी भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. वाहतूक ठप्प झाली आहे आणि नागरिकांचे हाल सुरू आहेत.

या आपत्तीजनक परिस्थितीची गंभीर दखल घेत महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी तात्काळ कारवाई करत एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) विभागाशी संपर्क साधून फलटणसाठी मदतीची तुकडी मागवली आहे. ही तुकडी लवकरच सस्तेवाडी परिसरात दाखल होऊन अडकलेल्या नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणार आहे.

फलटण शहरातील बाणगंगा नदीला आलेल्या पुरामुळे शनीनगर भागात पूरस्थिती गंभीर बनली असून, अनेक घरांमध्ये पाणी घुसले आहे. चारचाकी वाहने पाण्यात बुडाली आहेत. बाधित नागरिकांना बाजारे शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचे आणि नागरिकांच्या मदतीसाठी तत्काळ उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले असून, एनडीआरएफ जवान लवकरच मदतीसाठी प्रत्यक्ष कारवाई सुरू करणार आहेत.