pune young pedestrian killed and two others were injured after being hit by speeding Truck

0
28
pune young pedestrian killed and two others were injured after being hit by speeding Truck


पिंपरी : भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे पादचारी तरुणाचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. ही घटना शिक्रापूर – चाकण रोडवर घडली.रोहित सत्यवान जाधव (रा. चाकण) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. सत्यम विजय कोते (वय २१, रा. हरी ओम कॉम्प्लेक्स, चाकण) आणि राहुल संतोष कोळी हे जखमी झाले. सत्यम याने चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. रामराव सौदाजी नांगरे (वय ५९, रा. सणसवाडी, ता. शिरूर) असे अटक केलेल्या आरोपी ट्रकचालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्यम हे मित्र रोहित यांच्यासोबत भाकरी आणण्यासाठी चालले होते. ते शिक्रापूर-चाकण रोडवरील विशाल गार्डन चौकाजवळ आले असता रामराव चालवत असलेल्या ट्रकने एका थांबलेल्या जीपला धडक दिली. त्यानंतर रोहित यांनाही धडक दिली. या अपघातात रोहित यांचा मृत्यू झाला, तर सत्यम आणि राहुल हे जखमी झाले. फौजदार बोरकर तपास करीत आहेत.

मोटारीच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी

भरधाव मोटारीने धडक दिल्यामुळे दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. ही घटना पुणे – नाशिक महामार्गावर वाकीफाटा येथे घडली. अपघातानंतर मोटारचालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. संतोष गोविंद बेडुरे (वय ४६, रा. टेकवडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेतमध्ये मोटार पेटवली

रावेत येथे रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या मोटारीची काच फोडून मोटार पेटवून देण्यात आली. या प्रकरणी राघू पांडुरंग गव्हाळे (वय २७, रा. रमाबाईनगर, रावेत) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गव्हाळे यांनी सोमवारी गणेश सृष्टी या इमारतीसमोरील रस्त्यावर मोटार उभी केली होती. पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान अनोळखी व्यक्तीने दगडाने मोटारीची काच फोडली आणि मोटार पेटवून दिली.



Source link