
फलटण | प्रतिनिधी :- फलटण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक यश मिळवत तब्बल 35 वर्षांची राजे गटाची सत्ता उलथवून लावली आहे. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षांनी एकत्र येत नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक निवडून आणत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या निकालामुळे फलटणच्या राजकारणात नवे समीकरण आकारास आले आहे.
नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपाचे समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची निवड झाली असली, तरी या विजयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही मोठा वाटा असल्याचा दावा करण्यात येत आहे. प्रचार, संघटन आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रभावी भूमिका बजावल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर फलटण नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावे, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फलटण तालुका अध्यक्ष श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी मांडली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले,
“महायुतीच्या विजयात राष्ट्रवादी काँग्रेसचा वाटा मोठा आहे. त्यामुळे सत्तेतील सहभाग म्हणून उपनगराध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणे योग्य ठरेल.”
मात्र त्यांनी पक्षातील शिस्त आणि आघाडीतील एकात्मतेवर भर देत स्पष्ट केले की,
“महायुतीची कोअर कमिटी जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल. पक्ष व आघाडीच्या हितासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे महत्त्वाचे आहे.”
दरम्यान, उपनगराध्यक्ष पदावरून महायुतीतील हालचालींना वेग आला असून अंतिम निर्णयाकडे फलटणकरांचे लक्ष लागले आहे. कोअर कमिटी नेमकी कोणती भूमिका घेते आणि सत्तेतील समतोल कसा राखला जातो, यावर आगामी राजकीय घडामोडी अवलंबून असणार आहेत.
याचबरोबर येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रच निवडणूक लढवणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले असून, या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 50 टक्के जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी व्यक्त केली आहे.







