फलटण तालुक्यात राजकीय भूकंप! कोळकी–चौधरवाडीत राजे गटाला मोठा हादरा

0
60
फलटण तालुक्यात राजकीय भूकंप! कोळकी–चौधरवाडीत राजे गटाला मोठा हादरा

फलटण :- फलटण तालुक्यात राजकीय भूकंप! कोळकी–चौधरवाडीत राजे गटाला मोठा हादरा
फलटण तालुक्यातील राजकारण सध्या वेगाने नवे वळण घेत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या फलटण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घवघवीत यश मिळवत सत्तास्थापना केली. नगराध्यक्ष पदासह तब्बल 18 नगरसेवक निवडून आणत बहुमत मिळवणाऱ्या या आघाडीने सलग 35 वर्षे फलटणवर वर्चस्व गाजवणाऱ्या राजे गटाची सत्ता संपुष्टात आणली.
या निकालानंतर तालुक्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलू लागली असून, राजे गटाला एकामागून एक धक्के बसत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याचे संकेत असतानाच, कोळकी परिसरावर दीर्घकाळ प्रभुत्व असलेल्या राजे गटाला मोठा हादरा बसला आहे.
कोळकी व चौधरवाडी येथील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी राजे गटाशी फारकत घेत थेट भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केल्याने तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. कोळकी येथील प्रभावी कार्यकर्ते अभिजीत शिंदे, बाळासाहेब रिटे व संजय अहिरे यांनी राजे गटाला रामराम ठोकत भाजपची वाट धरली आहे. तसेच चौधरवाडीचे विद्यमान सरपंच तुकाराम कोकाटे व प्रल्हाद दंडीले यांनीही राजे गटाशी संबंध तोडून मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला.
या प्रवेशामुळे कोळकी व चौधरवाडी परिसरात भाजपचे संघटन अधिक मजबूत झाले असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला याचा मोठा फायदा होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. राजे गटातील वाढती नाराजी, अंतर्गत मतभेद आणि बदलते राजकीय वारे यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी भाजपकडे मोर्चा वळवल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे.
दरम्यान, भाजप नेतृत्वाने पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करत “सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर विकासाभिमुख राजकारण अधिक मजबूत करण्याचा संकल्प” व्यक्त केला आहे. या घडामोडींमुळे फलटण तालुक्यातील राजकीय वातावरण अधिक तापले असून, येणाऱ्या निवडणुकांमध्ये चुरस वाढणार हे निश्चित मानले जात आहे.