
फलटण प्रतिनिधी :- फलटण नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचाली अधिक गतीमान झाल्या आहेत. अलीकडेच राजे गटातील काही कार्यकर्त्यांनी खासदार गटात प्रवेश केल्यानंतर तयार झालेल्या परिस्थितीवर बीबी (ता. फलटण) येथील कार्यक्रमात विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी संयमी परंतु अर्थपूर्ण भाष्य केले.
कार्यक्रमात ते म्हणाले,
“हाताची मूठ सेल सोडल्यानंतर रिकामी राहत नाही; ती पुन्हा भरते. तसेच तरुण कार्यकर्ते कधी तयार झाले, हे तुमच्या लक्षातही आले नाही.”
त्यांच्या या वक्तव्याने राजकीय चर्चांना आणखी रंग चढला.
यानंतर सोमवार पेठ, फलटण येथील नामवंत युवा कार्यकर्ता पै. राहुल रमेश पवार (आरडी) यांनी श्रीमंत संजीवराजे, श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत अनिकेतराजे, श्रीमंत विश्वजीतराजे आणि श्री सह्याद्री कदम यांच्या उपस्थितीत राजे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांचे वडील रमेश पवार तसेच बंधू रोहन पवार व सूरज पवार यांनीही गटात प्रवेश जाहीर केला.
राहुल पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘आरडी मित्र समूह’ च्या माध्यमातून शहर व तालुक्यात मोठा युवा वर्ग सक्रिय आहे. त्यांच्या प्रवेशामुळे फलटण नगरपालिका निवडणूक तसेच फलटण पंचायत समिती आणि सातारा जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राजे गटाची ताकद वाढेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.







