विसर्जन सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज; डीजेला सक्त मनाई, नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई

0
26
विसर्जन सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज; डीजेला सक्त मनाई, नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई

फलटण – आगामी गणेश विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. मिरवणुकीतील वाद टाळण्यासाठी पारंपरिक विसर्जन मार्गात बदल करण्याची मागणी काही नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, डीजेचा वापर आढळल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा सक्त इशारा पोलिसांनी दिला आहे.

ही माहिती फलटण शहर पोलिस स्टेशनमध्ये पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देण्यात आली.


विसर्जन मार्ग बदलण्याची मागणी

बैठकीदरम्यान माजी उपनगराध्यक्ष सुनील मठपती यांनी मिरवणुकीचा पारंपरिक मार्ग बदलण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले,

“सर्व मंडळे गजानन चौक ते राम मंदिर येथे एकत्र येत असल्याने चढाओढ निर्माण होते आणि वाद होण्याची शक्यता वाढते. हे टाळण्यासाठी नवीन मार्ग निश्चित करणे आवश्यक आहे.”

रविवार पेठ तालीम गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष नितीन चोरमले यांनी मंडळांना ठराविक वेळा निश्चित करून देण्याची व शक्यतो जवळच्या मार्गाने विसर्जनास परवानगी देण्याची सूचना केली, जेणेकरून प्रेक्षकांची धक्काबुक्की आणि वाद टाळता येतील.


डीजेला सक्त मनाई; पोलिसांचा कडक इशारा

पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की,

“मंडळांचा भर देखाव्यांपेक्षा डीजेवर जास्त आहे. मात्र, डीजेमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात आणि कायद्याचे उल्लंघन होते. यंदा मिरवणुकीत डीजे आढळल्यास आवाजाची पातळी तपासली जाणार नाही, थेट गुन्हा दाखल होईल आणि डीजे प्रणाली जप्त केली जाईल. वरिष्ठ कार्यालयाकडूनही याबाबत कठोर आदेश प्राप्त झाले आहेत.”


दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांवरही कारवाई

श्री. शहा यांनी पुढे सांगितले की,

“दारू पिऊन धिंगाणा घालणारे तसेच आरटीओच्या नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालक यांच्यावरही गुन्हे दाखल केले जातील. गेल्या वर्षी ५ गुन्हे दाखल झाले होते; परंतु यंदा नियमभंग करणाऱ्यांवर १०० टक्के कारवाई होणार आहे.”


या बैठकीस पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे तसेच शहरातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

,