फलटण: विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदार जनजागृती अभियान

0
2
फलटण: विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदार जनजागृती अभियान

फलटण – आगामी 2024 विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने 255 फलटण (अ.जा) विधानसभा मतदारसंघात मतदान जनजागृतीसाठी स्वीप (Systematic Voters’ Education and Electoral Participation) अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. 12 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता यशवंतराव चव्हाण क्रीडा मैदान, फलटण येथे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे आणि स्वीप नोडल अधिकारी सचिन जाधव यांची उपस्थिती होती. याशनी नागराजन यांनी उपस्थित मतदार आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधत, आपल्या कुटुंबीयांसह समाजातील प्रत्येक व्यक्तीने 20 नोव्हेंबर रोजी मतदान करण्यासाठी बाहेर पडण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात मतदान जनजागृतीसाठी राष्ट्रगीताने सुरुवात झाली आणि ‘मतदार राजा जागा हो’ या लोकगीतातून सादरीकरण करण्यात आले. 1000 विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या नकाशात 100% मतदानाचे प्रतिबिंबण करणारी रांगोळी आणि मानवी साखळी तयार केली. तृतीयपंथीय समाजातील मतदारांनीही शंभर टक्के मतदानाचे आवाहन केले, तसेच त्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी मतदानाचा हक्क बजावण्याची शपथ घेण्यात आली. उपस्थित नागरिक, नगर परिषद अधिकारी, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षकांनी “मतदान करा, लोकशाही रुजवा” अशा घोषवाक्यांसह जनजागृती केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वीप नोडल अधिकारी सचिन जाधव यांनी केले.