फलटण तालुक्याला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत २ कोटी रुपयांचा निधी – खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पुढाकार

0
54
फलटण तालुक्याला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत २ कोटी रुपयांचा निधी – खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पुढाकार

फलटण (प्रतिनिधी) – राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा सर्वांगीण विकास व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत फलटण तालुक्याला तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

या निधीतून तालुक्यातील विविध गावांमध्ये समाजमंदिर, रस्ते, अभ्यासिका, विहार, स्मशानभूमी, संविधान भवन आणि शौचालय यांसारखी कामे हाती घेण्यात येणार आहेत. या विकासकामांमुळे ग्रामीण वस्तीतील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळून जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.

फलटण तालुक्यातील मंजूर झालेली कामे पुढीलप्रमाणे आहेत –
१) तडवळे वाघोली येथे तक्षशिला नगर येथे अभ्यासिका बांधणे – १० लाख रुपये
२) पिंपोडे बुद्रुक येथे बौद्ध विहार संरक्षण भिंत व व्यासपीठ बांधणे – १० लाख रुपये
३) निरगुडी येथे लोंढे वस्ती ओढ्यावरील पूल बांधणे – २० लाख रुपये
४) दालवडी येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्ता सुधारणा – १० लाख रुपये
५) गुणवरे येथे दलित वस्तीतील रस्ता सुधारणा – १० लाख रुपये
६) आसू येथे समाजमंदिर बांधणे – १० लाख रुपये
७) साखरवाडी येथे पेविंग ब्लॉक बसवणे – १० लाख रुपये
८) खामगाव येथे समाजमंदिर बांधणे – १० लाख रुपये
९) सांगवी येथे जगताप वस्तीवरील रस्ता सुधारणा – १० लाख रुपये
१०) तरडगाव येथे समाजमंदिर बांधणे – १० लाख रुपये
११) गिरवी येथे मातंग समाजासाठी स्मशानभूमी बांधणे – १० लाख रुपये
१२) निंभोरे येथे संविधान भवन बांधणे – २० लाख रुपये
१३) सालपे येथे रस्ता सुधारणा – १० लाख रुपये
१४) आळजापूर येथे मसुगडे वस्ती रस्ता सुधारणा – १० लाख रुपये
१५) राजाळे येथे ग्रामपंचायत जागेत सभा मंडप बांधणे – १० लाख रुपये
१६) निंबळक येथे वस्ती रस्ता सुधारणा – १० लाख रुपये
१७) सुरवडी येथे रस्ता सुधारणा – १० लाख रुपये
१८) सस्तेवाडी येथे हनुमान नगर येथे शौचालय बांधणे – १० लाख रुपये

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, “फलटण तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा जो शब्द मी जनतेला दिला आहे, तो पूर्ण करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे.”

या योजनेमुळे फलटण तालुक्यातील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये मूलभूत सोयी-सुविधांचा विकास होऊन सामाजिक समता, शिक्षण आणि प्रगतीस चालना मिळणार आहे.