फलटण, – येत्या २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि नागरिकांना सोयीस्कर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी फलटण नगरपरिषद प्रशासनाने गणेश मूर्ती विक्रीसाठी अधिकृत जागा निश्चित केली आहे. नियम मोडणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल मोरे यांनी या संदर्भात आवाहन प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, सर्व गणेश मूर्तिकार आणि विक्रेत्यांनी आपले स्टॉल्स फक्त महात्मा फुले चौक येथील मुधोजी क्लबच्या बाजूपासून ते माळजाई मंदिर गेटपर्यंतच्या परिसरातच उभारावेत, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
नेमून दिलेल्या जागेबाहेर मूर्ती विक्रीसाठी स्टॉल उभारल्यास नगर परिषदेच्या नियमांनुसार कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाने जाहीर केले आहे.
उत्सवाच्या काळात वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि नागरिकांना मूर्ती खरेदीसाठी एकाच ठिकाणी सुविधा मिळावी, या दुहेरी उद्देशाने हे नियोजन केले असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
👉 सर्व मूर्तिकार व व्यापाऱ्यांनी या नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन फलटण नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.