
🛕 माळजाई मंदिर येथे 28 सप्टेंबर रोजी भाविकांसाठी विशेष व्यवस्था
फलटण : नवरात्र उत्सवानिमित्त माळजाई मंदिर व उद्यान समितीच्या वतीने रविवार, दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी माळजाई मंदिर येथे नवरात्र उत्सवाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला भाविक भक्त व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी नगरपालिका प्रशासनाने विशेष उपाययोजना आखल्या आहेत.
रविवारच्या आठवडी बाजारामध्ये मुधोजी क्लबच्या बाजूच्या रस्त्यावर, महात्मा फुले चौक ते श्रीमंत मालोजीराजे पुतळा या ठिकाणी बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांनी नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या पर्यायी जागेवर आपली दुकाने लावावीत, असे आवाहन फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. निखिल जाधव यांनी केले आहे.
नगरपालिका प्रशासनाच्या या नियोजनामुळे भाविकांना मंदिरात दर्शनासाठी व नागरिकांना ये-जा करण्यासाठी सुविधा होणार आहेत.







