
फलटण :- फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात राजकीय तापमान वाढताना दिसत आहे. फलटणमधील दोन प्रमुख गटांनी आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर केली असून, यात राजे गटाचे नेतृत्व करणारे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी खटके वस्ती, ता. फलटण येथे आमदार दिपक चव्हाण यांना चौथ्यांदा उमेदवारी दिली आहे. रामराजे यांनी सांगितले की, तीन टर्मपेक्षा कोणालाही जास्त संधी मिळाली नाही, परंतु चव्हाण यांना त्यांच्या कामाची दखल घेत चौथी संधी दिली जात आहे.
दुसरीकडे, भाजपचे मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देखील आपल्या गटाच्या उमेदवारीसाठी सचिन कांबळे पाटील यांचे नाव जाहीर केले आहे. ही घोषणा होताच, मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे, आणि आगामी काळात दुहेरी, तिरंगी की चौरंगी लढत होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अनुसूचित जातीतील बौद्ध समाजातील लोक यामुळे नाराज असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या गटाचे लोक आपल्या समाजातील व्यक्तीसाठी उमेदवारीची मागणी करत आहेत, मात्र त्यांच्या मागण्यांचा विचार झाल्याचे दिसत नाही. फलटण कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाकडे सर्वाधिक इच्छुक आहेत. यामध्ये बौद्ध, मातंग आणि होलार समाजातील इच्छुकांनीही उमेदवारीची मागणी केली आहे.
आज पुण्यातील मोदी बाग येथे नंदकुमार मोरे आणि बापूसाहेब जगताप यांनी शरद पवारांची भेट घेतली. जगताप यांचे उमेदवारीसाठी परिचयपत्र पवारांकडे देण्यात आले. यावेळी आझमभाई पानसरेही उपस्थित होते. विशेष म्हणजे, नंदकुमार मोरे यांनी स्वतःसाठी उमेदवारीची मागणी न करता, बौद्ध समाजाला उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली. यामुळे त्यांच्या दिलदारपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आता येणाऱ्या दहा दिवसात कोणते निर्णय होतील, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.







