29 वर्षांनी बदलाचा बिगुल: सचिन पाटील यांचा थरारक विजय, राजे गटाला जबर धक्का

0
34
29 वर्षांनी बदलाचा बिगुल: सचिन पाटील यांचा थरारक विजय, राजे गटाला जबर धक्का

फलटण: फलटण-कोरेगाव राखीव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार सचिन पाटील यांनी थरारक विजय संपादित करत राजे गटाची 29 वर्षांची सत्ता उलथवली आहे. सचिन पाटील यांनी विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद गट) चे दीपक चव्हाण यांचा तब्बल 17,046 मतांनी पराभव केला आहे.

पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतलेल्या सचिन पाटील यांनी मतमोजणी दरम्यान ही आघाडी सतत वाढवत नेली. सकाळपासूनच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. शहरभर फटाक्यांची आतषबाजी व गुलाल उधळण करत, रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वातील महायुतीच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.

महत्त्वाचे मुद्दे आणि प्रचाराची रणनिती:

पाणी प्रश्न, रस्त्यांचे काम, निरा देवघर प्रकल्प, आणि कामगारांचे प्रश्न या मुद्द्यांवर रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराची धार दिसून आली.

फलटणची बारामतीशी तुलना, लाडकी बहीण योजना आणि विकासकामांचा लेखाजोखा मांडत जनतेचा कौल मिळवण्यात महायुती यशस्वी ठरली.

दुसरीकडे, राजे गटाकडून प्रभावी प्रतिउत्तर न मिळाल्याने मतदारांचा रोष उफाळून आला.

परिणाम:
सचिन पाटील यांना 1,19,287 मते, तर दीपक चव्हाण यांना 1,02,247 मते मिळाली. फलटणकरांनी सलग चौथ्यांदा कोणालाही आमदार होऊ दिले नसल्याचा इतिहास कायम राखला आहे.

हा विजय केवळ राजकीय नाही, तर फलटण तालुक्यातील बदललेल्या जनतेच्या मनोवृत्तीचे प्रतीक ठरला आहे.