सततच्या पावसाने खरीप पिके धोक्यात; शेतकरी चिंतेत

0
83
सततच्या पावसाने खरीप पिके धोक्यात; शेतकरी चिंतेत

फलटण तालुक्यात सततचा पाऊस — मुग, तुर, सोयाबीन, कापूस व डाळिंब पिकांचे मोठे नुकसान

फलटण (प्रतिनिधी) – गेल्या चार महिन्यांपासून कमी-जास्त प्रमाणात पडत असलेल्या सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. विशेषतः मागील आठवडाभर अखंड कोसळणाऱ्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले असून, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मुग, तुर, बाजरी, ज्वारी, डाळिंब तसेच सोयाबीन आणि कापूस या पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास ही पिके कुजण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

फलटण तालुक्यात पावसाची तीव्रता जास्त असल्याने कमी कालावधीत मुसळधार पाऊस पडत आहे. मे महिन्याच्या अखेरीसच पावसाने कहर केला होता. त्या वेळीच तालुक्याने वार्षिक सरासरी पावसाचा आकडा पार केला होता. पाऊस थांबेल अशी अपेक्षा होती; मात्र तो न थांबल्याने शेतकऱ्यांचे नुकसान वाढले आहे.

फलटण तालुका पारंपरिकपणे रब्बी हंगामासाठी ओळखला जातो, पण गेल्या काही वर्षांत योग्य पावसामुळे खरीप हंगामही यशस्वी होऊ लागला आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी उत्साहाने खरीप पिकांची लागवड पूर्ण केली होती. मात्र सप्टेंबर अखेरही पावसाचे प्रमाण न कमी झाल्याने अनेक पिके पाण्यात बुडाली आहेत.

कापूस आणि बाजरीसारखी पिके जास्त पावसात टिकत नाहीत. सध्या ही पिके पिवळी पडली असून किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. कपाशीची पाती गळत असून मूग, उडीद आणि मक्याचेही नुकसान झाले आहे. काही शेतकरी अजूनही पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत, जेणेकरून उशिरा पेरणी करता येईल.

सप्टेंबर महिन्यातील ‘हस्त नक्षत्र’ सामान्यतः पावसाळ्याचा शेवट मानला जातो. मात्र या वर्षी हस्त नक्षत्रातही सतत पाऊस सुरूच असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील काही दिवसांत पाऊस ओसरला नाही तर खरीप हंगामाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.