
बारामती – दरवर्षीप्रमाणे दिवाळी पाडव्याच्या दिवशी गोविंद बाग या शरद पवार यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांसोबत होणारा दिवाळी भेट कार्यक्रम यंदा होणार नाही. उद्योगपती प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचे नुकतेच दुःखद निधन झाले असून, त्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबीयांनी यंदा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे.
सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या वर्षी दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं आहे. गेल्या वर्षी गोविंद बागेत शरद पवार, सुप्रिया सुळे, आणि रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली होती, तर अजित पवार, सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी काटेवाडी येथील निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारल्या होत्या.
मात्र, यंदा कुटुंबावर आलेल्या वैयक्तिक दुःखामुळे दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, नेहमीप्रमाणे होणारा दिवाळी भेटीचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे.








