
संसदेमध्ये झालेल्या घुसखोरी प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत निवेदन करावं अशी मागणी करणाऱ्या विरोधी पक्षाच्या आणखी ४१ खासदारांचं आज, मंगळवारी संसदेतून निलंबन करण्यात आलं. संसदेच्या दोन्ही सभागृहातून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची आता एकूण संख्या १४१ झाली आहे. आज निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, कॉंग्रेसचे खासदार कार्ति चिदंबरम, शशी थरुर, मनिष तिवारी, समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव या प्रमुख खासदारांचा समावेश आहे. केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी या खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. या खासदारांनी संसदेत येऊन घोषणा देत फलक दाखवल्याबद्दल त्यांना निलंबित करण्यात आले असल्याचे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. या खासदारांच्या वर्तनाने नियमांचा भंग झाला असून लोकसभा अध्यक्षांचा अवमान झाला असल्याचं जोशी यांनी सांगितलं. निलंबित करण्यात आलेल्या ९२ खासदारांना संसदेचं हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत सभागृहाच्या कामाकाजात सहभागी होता येणार नाही.








