फलटण – आगामी निवडणुकीच्या तोंडावर माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे यांच्यावर केलेले आरोप खोटे असल्याचे उघड झाले आहे. अनुप शहा यांनी केलेले हे आरोप निव्वळ निवडणुकीचा स्टंट असल्याचे सिद्ध झाले आहे.
2021 साली नगरपरिषद प्रकरणात सागर शहा यांनी पांडुरंग गुंजवटे यांच्यावर खोट्या गुन्ह्याच्या आधारे तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलीस तपासात ही तक्रार निराधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. माहितीच्या अधिकारात फलटण शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या अहवालात असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, घटनास्थळी कोणताही गुन्हा झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत, तसेच हा गुन्हा मुद्दाम बनाव केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
याशिवाय, 2019 विधानसभा निवडणुकीच्या मतदाना दिवशी सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्येही पांडुरंग गुंजवटे निर्दोष असल्याचे न्यायालयाने 7 जुलै 2023 रोजी घोषित केले आहे. या प्रकरणाची जजमेंट कॉपी देखील गुंजवटे यांच्याकडे उपलब्ध आहे.
ॲट्रॉसिटी कायद्याखाली दाखल झालेल्या प्रकरणातही पांडुरंग गुंजवटे यांची निर्दोष मुक्तता झाली असून, विशेष म्हणजे अनुप शहा यांनी स्वतः आपल्या जबाबात पांडुरंग गुंजवटे निर्दोष असल्याचे मान्य केले आहे.
या सर्व प्रकारामुळे हे आरोप केवळ निवडणूक काळातील राजकीय खेळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. “सुज्ञ नागरिक जाणतात की हे सर्व कोणाच्या आदेशाने केले जात आहे,” असे माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे यांनी स्पष्ट केले.