
फलटण (प्रतिनिधी) : दुःखमुक्तीचे मार्गदाता विश्ववंदनीय तथागत सम्यक संबुद्ध, या भारत देशामध्ये तथागताचा पवित्र सदधम्म असताना काही कारणास्तव या देशातून झाकला, लपवला, नष्ट केला. काही लोकांनी पळवला पण ज्यांच्या महान कष्टाने, ज्यांच्या महान विद्वत्तेने, ज्यांच्या महान शिलाने, ज्यांच्या महान शिक्षणाने या भारत देशात पुन्हा धम्मक्रांती झाली. ते धम्मक्रांतीचे उद्गाता, तुमचे आमचे उद्धारकर्ता, भाग्यविधाता असे म्हणतात की, आम्हाला देवही नव्हता आणि धर्मही नव्हता.आम्हाला घरी ही नव्हतं आणि दारही नव्हतं, झाडं ही नव्हतं आणि झाडाची फांदी ही नव्हती. पण त्याच भिमरायाच्या पुण्याईने आज आम्ही माणसात आलो. आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, परमपूज्य विश्ववंदनीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर!
इ. स 528 ला तथागतांना संबोधी प्राप्त झाली. सम्यक ज्ञान प्राप्त झाले.त्यांना असं वाटलं माझा धम्म साधा, सोपा आणि सरळ आहे. माझा धम्म ऐकेल कोण? माझा धम्म समजून घेईल कोण? यावेळी तथागतांना उद्दक रामपुत्त यांची आठवण आली. ते ज्ञानी होते.विद्वान होते. गृहत्यागी होते. ते वयाने मोठे असल्यामुळे ते मरण पावले होते. पुन्हा त्यांना आठवण आली आलारकालाम यांची ते ध्यानात प्रवीण होते. तेही वयाने मोठे असल्यामुळे कालबद्ध झाले होते. मरण पावले होते. ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी प्रथम सारनाथ (जि.वाराणसी) येथे जाऊन पहिला धर्मोपदेश (धम्मचक्र प्रवर्तन) केला. हा उपदेश त्यांनी आपल्या पूर्वीच्या पाच सहधर्म्यांना दिला, जे “पंचवर्गीय भिक्खू” म्हणून ओळखले जातात.
हे पंचवर्गीय भिक्खू म्हणजे कोंडञ्ञ (कौण्डिन्य),भद्दिय, वप्प, महनाम अस्सजित ते त्यावेळी ऋषीपतन वनामध्ये ज्याला मृगदाय वन म्हणून सुद्धा ओळखले जात होते. ते तेथे होते.आज आपण जिथे तथागतांनी प्रथम धम्मदेसना दिली. त्याला सारनाथ आपण म्हणतो.108 नाथांचा नात म्हणजे सारीनाथ असा ही उल्लेख आढळतो. इथे पंचवर्गीय भिक्खू होते आणि तिथूनच बौद्ध धम्माची सुरुवात झाली. असा हा तो आदरणीय भिक्खू संघ त्या भिक्खू संघाला चिवर असेल, भिक्षा पात्र असेल, पाणी गाळण्याचा कपडा किंवा ब्लेड असेल, जमीन असेल, भोजन असेल त्या काळात भिक्खू संघाला दान दिले जायचे.
नालासोपारा परिसरात बौद्ध धम्माचा प्रभाव प्राचीन काळापासून आहे.हे स्तूप बुद्धांचे अवशेष किंवा पवित्र वस्तू ठेवण्यासाठी उभारले गेले.सुमारे अडीच हजार वर्षांपुर्वी पूर्णा नामक व्यापाऱ्याने याची निर्मिती केली.पूर्वी नालासोपारा हे शूर्पारक नावाने ओळखले जात होते. हा स्तुप चंदनाच्या लाकडापासुन बनविण्यात आला होता असे म्हणतात. नालासोपारा येथे गौतम बुद्धांनी भेट दिली होती, असे मानले जाते, पूर्णा या व्यापाऱ्याने श्रावस्ती येथे भगवान बुद्धांच्या उपदेशाला उपस्थित राहून बौद्ध धर्म स्वीकारला.पूर्णा परत आल्यावर, त्यांनी शिष्यांच्या मदतीने नालासोपारा येथे एक बुद्ध विहार बांधले. आज त्याच ठिकाणच्या एका विटे पासून या ठिकाणी चैत्याची केलेली निर्मिती ही आपल्या सगळ्यांना कायम प्रेरणा देत राहील. मी अनेक गावे फिरलो पण इतके सुंदर चैत्य कुठेही निर्माण केलेले नाही.
लेण्यांच्या संवर्धनाचे काम मी करतो. साडेचारशे च्या वर लेण्या मी पाहिल्या आहेत परंतु अनेक ठिकाणी आमच्या लेण्या असून त्यावर अतिक्रमण करण्यात आली आहेत. बौद्धांचे श्रद्धास्थान असणाऱ्या महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे यासाठी दिल्लीमध्ये जंतर-मंतर वरती आंदोलने केली. परंतु या ठिकाणी कोट्यावधी रुपये दान येते. त्यामुळे मनुवाद्यांना ते मंदिर सोडायचे नाही. जगातल्या 56 देशातून जवळ जवळ 200 कोटी दान म्हणून जमा होत असल्याने हे मनुवाद्यांना बौद्धांच्या ताब्यात द्यायचे नाही. आजही ते दिले जात नाही. पुणे जिल्ह्यामध्ये 200 पेक्षा जास्त लेण्या आहेत. आज लेण्यांमध्ये नवनवीन देव तयार होऊ लागले आहेत. लेण्यामध्ये मध्ये अवैध गोष्टी राजरोसपणे सुरू आहेत. त्यामुळे रात्रच नाही तर दिवस पण वैऱ्याचा आहे. हा समृद्ध वारसा डोळ्यात तेल घालून आपण जपला पाहिजे त्याचे संरक्षण केले पाहिजे.
मी अनेक गावांमध्ये फिरलो तिथे वेगवेगळे बाबा तयार झाले आहेत. त्यामुळे अज्ञान व अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन लोक कर्मकांडांना जवळ करत आहेत.आपलेही लोक त्यात आहेत.ज्यांनी आपल्याला हजारो वर्ष गुलामगिरीच्या शृंखलांमध्ये मध्ये बंदिस्त केले. त्यातून मुक्त करण्यासाठी वरीलपैकी कोणताही बाबा आला नाही. पण एक बाबा जन्माला आला आणि त्यांनी आम्हाला या गुलामगिरीतून मुक्त केले. ते बाबा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
“जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुले; तोचि साधु ओळखावा, देव तेथेंचि जाणावा.”
हे समजण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सुरु असणाऱ्या धम्म कार्यात आपण सहभागी झाले पाहिजे.आज भारतीय बौध्द महासभा भारतातील 24 पेक्षा जास्त राज्यात धम्माचे काम करत आहे. आज भारतीय बौद्ध महासभा गावोगावी काम करत आहे.हे पाहून समाधान वाटते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे वडील कबीर पंथी असल्याने बाबासाहेबांना कबीराचे दोहे म्हणायला लावायचे.
“कर कमाई, बंदे, लेकर यहा तू जायेगा;
का रोवे, का हसावे, ये सब साथ लायेगा।”
हा दोहा जीवनात कर्म करण्याचे महत्त्व सांगतो आणि हे दर्शवतो की माणूस आपल्या कर्मांच्या फळांसहच या जगात येतो आणि जातो.
आपल्या कुटुंबाला धम्म मार्गावर आणण्यासाठी धम्माचा विचार, आचार व संस्कार रुजण्यासाठी घरातील महिलांना, पत्नीला सन्मान देणे, सन्मान करणे हेच धम्माचे व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले सार आहे.ज्या कुटुंबातील स्त्रिया पुढे असतात ते कुटुंब ही पुढे जाते. त्यासाठी कुटुंबातील माता भगिनींचा सन्मान करायला पाहिजे. महिलांच्या सन्मानासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणले.
आज निकाळजे परिवाराने या ठिकाणी जो सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल मी त्यांच्या प्रति मंगल मैत्रीची भावना व्यक्त करतो. त्यांना आशीर्वाद देतो. हेच संस्कार घरोघरी रुजले पाहिजेत. हेच काम भारतीय बौद्ध महासभा अतिशय चांगल्या प्रकारे करत आहे त्यांच्याही वायुगतीने चाललेल्या कार्याला मी शुभेच्छा देतो.सर्वांनाच आशीर्वाद करतो. सर्वांचे मंगल होवो! सर्वांचे कल्याण होवो!
यावेळी भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्वचे संघटक श्रीमंतराव घोरपडे सर, फलटण तालुका शाखेचे अध्यक्ष आयुष्यमान महावीर भालेराव सर, महासचिव बाबासाहेब जगताप सर, कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे सर, भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेच्या अध्यक्षा रंजना राजकुमार रणवरे मॅडम, कोषाध्यक्षा आयुनी.वृषालीताई झेंडे मॅडम, केंद्रीय शिक्षिका आयुनी करुणा मोहिते मॅडम, प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयु. रामचंद्र मोरे सर, संस्कार सचिव आयु.बजीरंग गायकवाड, कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते सर, संघटक विजयकुमार जगताप सर,अमोल काकडे सर, प्रवचनकार सोमीनाथ घोरपडे सर, आयु.राजकुमार रणवरे सर, आयु. लक्ष्मणराव निकाळजे, आयु.बी डी घोरपडे, आयु.माणिकराव घोरपडे उपस्थित होते. यासोबत तक्षशिला बुद्ध विहार प्राधिकरण आकुर्डी पुणे येथून आयुष्यमान रमेश दिलपाक, संपत वाघमारे, हरिभाऊ मेश्राम, हिरामण रामटेके, बाळकृष्ण शिंदे, आनंद कदम व करुणा कदम, यशवंत भालेराव, श्रीधर रोकडे, मधुकर गायकवाड, प्रमोद लोखंडे,अजय जगताप, संतोष उणवणे, सचिन शिवशरण, सुरज रणपिसे, कुलदीप काकडे, अमोल कांबळे, एम एस कांबळे, सुदेश जगताप, रवी कांबळे हे उपस्थित होते.








