
पुणे : पुण्यातील गाजलेल्या आयुष कोमकर हत्याकांड प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. टोळीतील मास्टरमाईंड म्हणून समोर आलेला कृष्णा उर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. आज (सोमवार) सकाळी त्याने पुण्यातील समर्थ पोलिस ठाण्यात शरणागती पत्करली असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली आहे.
५ सप्टेंबर रोजी नाना पेठेतील राहत्या घराच्या पार्किंगमध्ये आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही हत्या माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला म्हणून झाल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी आधीच आंदेकर टोळीतील बंडू आंदेकर, शिवम आंदेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, वृंदावनी वाडेकर, अमन पठाण, यश पाटील, अमित पाटोळे, सुजल मेरगू यांना अटक करण्यात आली असून अटक आरोपींची संख्या आता तेरा झाली आहे.
दरम्यान, काल न्यायालयात हजर झाल्यानंतर बंडू आंदेकर यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. “माझ्या लहान मुलाला पोलिसांनी हजर व्हायला सांगितलं, अन्यथा त्याचा एन्काउंटर करू” अशी धमकी दिल्याचा दावा त्यांनी केला होता. यानंतर आज सकाळी कृष्णा आंदेकरने स्वतःहून समर्थ पोलिस ठाण्यात शरण घेतले.
कृष्णा आंदेकर हा आयुष कोमकर हत्येचा मास्टरमाईंड असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. त्याने रेकी करून हल्लेखोरांना सूचना दिल्याचेही समोर आले आहे. तो गेल्या ११ दिवसांपासून कुठे होता, त्याला कोणी मदत केली आणि हत्येत त्याचा नेमका सहभाग काय होता, याचा उलगडा आता चौकशीतून होणार आहे.








