फलटणच्या राजकारणात महिला नेतृत्वाची नवी आशा – प्रभाग 3 मधून पूनम भोसले यांची उमेदवारी चर्चेत

0
34
फलटणच्या राजकारणात महिला नेतृत्वाची नवी आशा – प्रभाग 3 मधून पूनम भोसले यांची उमेदवारी चर्चेत

फलटण (प्रतिनिधी): फलटण नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, प्रभाग क्र. 3 मधून पूनम सुनिल भोसले यांना राजे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून समजते. पूनम भोसले या सुप्रसिद्ध युवा नेते, पत्रकार आणि क्रिकेटपटू शक्ती उर्फ अशोक भोसले यांच्या चुलती असून, भोसले कुटुंबाचा राजकीय वारसा आणि सामाजिक कार्याचा ठसा त्यांच्या उमेदवारीवर स्पष्टपणे उमटतो आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून पूनम भोसले या रामराजे समर्थक म्हणून सक्रिय आहेत. त्यांनी महिलांचे सक्षमीकरण, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, तसेच परिसरातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्यातून त्यांनी प्रभागात चांगला जनसंपर्क आणि विश्वास निर्माण केला आहे.

अलीकडेच वाढदिवसाच्या निमित्ताने चर्चेत आलेले शक्ती भोसले हे युवकांमध्ये एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यशैलीचा प्रभाव पूनम भोसले यांच्या कार्यातही प्रकर्षाने दिसून येतो. भोसले परिवाराने फलटणच्या राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात केलेले योगदान नागरिकांच्या लक्षात राहिले आहे.

पूनम भोसले यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्र. 3 मध्ये राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हं दिसत आहेत. विरोधकांच्या गोटात खळबळ माजली असून, जनतेमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

“सामाजिक कार्यातून नेतृत्वाकडे” ही संकल्पना साकार करणाऱ्या पूनम भोसले यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी विश्वास दाखवला, तर महिलांना राजकारणात नवसंजीवनी मिळू शकते, असे निरीक्षण राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहे.

विधान परिषदेचे माजी सभापती आणि आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यशैलीवर श्रद्धा ठेवून पूनम आणि शक्ती भोसले हे पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी राहिले आहेत.

संपूर्ण फलटण शहर आता प्रभाग क्र. 3 मध्ये एक अनुभवसंपन्न, ऊर्जावान आणि जनतेशी थेट संवाद साधणाऱ्या महिला नेतृत्वाकडे आशेने पाहत आहे.


पूनम भोसले यांची उमेदवारी केवळ एक राजकीय पाऊल नसून, सामाजिक कार्यातून उदयास येणाऱ्या नेतृत्वाची ओळख ठरते. हे नेतृत्व प्रभाग 3 मध्ये सकारात्मक बदल घडवू शकते, अशी जनतेत भावना आहे.