सहकारात नवा विश्‍वास: दिलीपसिंह भोसले अध्यक्षपदी, जयकुमार शिंदे उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

0
15
सहकारात नवा विश्‍वास: दिलीपसिंह भोसले अध्यक्षपदी, जयकुमार शिंदे उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

फलटण साहस Times :- फलटण तालुक्यातील सहकारी पतसंस्थांच्या कार्यक्षमतेस नवी दिशा देण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरलेल्या फेडरेशनच्या निवडणुकीत दिलीपसिंह भोसले यांची अध्यक्ष, तर जयकुमार शिंदे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. सहकार क्षेत्रात नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने नूतन नेतृत्वाने काम सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

फलटण तालुका सहकारी पतसंस्थांचे फेडरेशन मर्यादित या संस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. प्रारंभी सद्‌गुरु व महाराजा उद्योग समूहाचे सरव्यवस्थापक संदीप जगताप यांनी नवनिर्वाचित संचालकांचे स्वागत केले. बैठकीत भोसले यांची अध्यक्ष तर शिंदे यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड झाली.

संस्थेचे संचालक रविंद्र बेडकिहाळ यांच्या हस्ते नव्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी दिलीपसिंह भोसले म्हणाले, “सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत सहकारी पतसंस्थांना सक्षम बनविण्यासाठी सर्व पतसंस्था पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेऊन काम सुरू केले जाईल.”

जयकुमार शिंदे यांनी आपल्या भाषणात लवकरच सर्व पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून कार्यक्षम व्यवस्थापनासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

फलटण तालुक्यात सध्या ६८ सहकारी पतसंस्था कार्यरत आहेत. यावेळी फेडरेशनचे संचालक प्रितम गांधी, गणपतराव निकम, शैलेंद्र शहा, धैर्यशील अनपट, अंकुश साळुंखे, गणपत बेंद्रे, सद्गुरु पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, राजाकाका फणसे व इतर मान्यवर उपस्थित होते.