
फलटण प्रतिनिधी :- फलटण तालुक्यातील सस्तेवाडी येथे घडलेली गणेश बाळू मदने यांची निघृण हत्या ही केवळ एका गरीब शेतकऱ्याची हत्या नसून, ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेवर झालेला गंभीर आणि थेट आघात आहे. दिनांक ६ रोजी गणेश बाळू मदने हे आपल्या शेतात काम करत असताना वन्य प्राण्यांची अवैध शिकार करणाऱ्या काही समाजकंटकांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या अमानुष हल्ल्यात त्यांची जागीच निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या पार्श्वभूमीवर जय मल्हार क्रांती संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन, फलटण येथे अधिकृत निवेदन सादर करून या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची, तसेच तपास फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्याची मागणी केली आहे. मृत गणेश मदने यांच्या कुटुंबाला तात्काळ न्याय मिळावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, तपासात कोणतीही दिरंगाई, हलगर्जीपणा किंवा कसूर झाल्यास संपूर्ण रामोशी समाज व जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल. “आज प्रश्न एकाचा नाही, उद्या कोणाचाही असू शकतो,” असा इशाराही प्रशासनाला देण्यात आला आहे. ग्रामीण भागात मेहनत करणाऱ्या रामोशी समाजातील गरीब व्यक्तीचा जीव इतका स्वस्त झाला आहे का, असा संतप्त सवाल या घटनेमुळे उपस्थित होत आहे.
या निवेदनावर जय मल्हार क्रांती संघटनेचे फलटण तालुका अध्यक्ष गणेश हणमंत मदने यांची स्वाक्षरी असून, यावेळी फलटण तालुक्यातील रामोशी समाजाचे ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोषींना कठोर शिक्षा होईपर्यंत हा विषय शांत होणार नाही, असा ठाम निर्धार समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आला असून, प्रशासनासाठी ही घटना खरी कसोटी ठरणार आहे.








