
फलटण :- राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नामनिर्देशन दाखल करण्यास सुरुवात झाली असून उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने https://mahasecelec.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. या संकेतस्थळावर उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्रातील माहिती भरावी लागते. आयोगाने स्पष्ट केले आहे की, ऑनलाइन फक्त माहिती भरणे आवश्यक असून कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही. माहिती भरून पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांनी त्याची मुद्रित प्रत (प्रिंट आउट) काढून त्यावर स्वतःची तसेच सूचकांची स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे.
स्वाक्षरी केलेली ही प्रिंटआउट प्रत प्रत्यक्षात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे जमा करताना आवश्यक कागदपत्रांसह सादर करणे आवश्यक आहे. या कागदपत्रांमध्ये नगरपरिषद/नगरपंचायतीचे नादेय प्रमाणपत्र, शौचालय वापर प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणापत्र, निवडणूक खर्चासाठी बँक खात्याचा तपशील, राखीव जागांसाठी जातप्रमाणपत्र, तसेच पक्षाकडून उमेदवारी असल्यास जोडपत्र-१ किंवा जोडपत्र-२ यांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, संपूर्ण संच विहित मुदतीत दाखल करणे अनिवार्य आहे.
संकेतस्थळ १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत २४ तास सुरू राहणार असून उमेदवार कोणत्याही वेळी नोंदणी करू शकतात. नोंदणी करताना तयार होणारा लॉगिन आयडी आणि पासवर्ड काळजीपूर्वक जतन करणे आवश्यक आहे, कारण पुढील सर्व माहिती भरण्यासाठी त्याची आवश्यकता असते. नामनिर्देशनपत्र आणि आवश्यक कागदपत्रांचा संपूर्ण संच १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करावाच लागेल.
विशेष म्हणजे, आयोगाने १५ नोव्हेंबर २०२५ या शनिवारी सुट्टी असूनही नामनिर्देशन स्वीकारण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, १६ नोव्हेंबर २०२५ रोजी रविवारी नामनिर्देशन स्वीकारले जाणार नाही. उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे सहज उपलब्ध करून देण्यासाठी सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींना योग्य निर्देश देण्यात आल्याचे आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.








