मुधोजी महाविद्यालयाचा एनएसएस कॅम्प ठरला ऐतिहासिक; भिलकटी येथे सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिराचा दिमाखदार समारोप

0
15
मुधोजी महाविद्यालयाचा एनएसएस कॅम्प ठरला ऐतिहासिक; भिलकटी येथे सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिराचा दिमाखदार समारोप

फलटण प्रतिनिधी :- मुधोजी महाविद्यालयाचा एनएसएस कॅम्प ठरला ऐतिहासिक; मिलकटी येथे सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिराचा दिमाखदार समारोप
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मौजे भिलकटी येथे आयोजित सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचा प्रारंभ दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी झाला होता. या शिबिराचा समारोप समारंभ दि. ४ जानेवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडला.
समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी मुधोजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या इतिहासातील हा आत्तापर्यंतचा सर्वांत यशस्वी कॅम्प असल्याचे गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी श्री. ना. निंबाळकर शंभुराजे यांनी केले, तर प्रास्ताविक प्रा. फिरोज शेख यांनी करून समारोप कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
यानंतर मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. मनोगतात प्रा. काळेल सर यांनी सात दिवसांत स्वयंसेवक, प्राध्यापक व शिबिराधिकारी यांनी केलेल्या कार्याचा सविस्तर आढावा घेत आभार व्यक्त केले. शिबिरातील अनेक विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन करताना, या शिबिरामुळे त्यांच्या आयुष्यात झालेल्या सकारात्मक बदलांविषयी भावना व्यक्त केल्या.
प्रमुख पाहुण्यांच्या भाषणात श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरे अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले. प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी उत्साहाने व शिस्तबद्ध पद्धतीने उत्कृष्ट कामगिरी केल्याचे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात मा. प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी विद्यार्थ्यांच्या व ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच शिबिराच्या यशाचे खरे मोजमाप असल्याचे सांगत या यशस्वी कॅम्पबद्दल समाधान व्यक्त केले.
या सात दिवसीय शिबिरात कडाक्याच्या थंडीतही विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये योगा, प्राणायाम, कार्डिओ डान्स, झुम्बा डान्स, मॉर्निंग वर्कआउट, सत्संग, प्रभात फेरी, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन, हळदी-कुंकू समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, मोफत दंतचिकित्सा व नेत्रतपासणी शिबिर, तसेच विविध महत्त्वपूर्ण विषयांवरील व्याख्याने यांचा समावेश होता.
समारोपाच्या दिवशी मिलकटी गावातील ग्रामस्थांनी प्रभात फेरीचे स्वागत सडा-रांगोळीने केले तसेच शिबिरार्थींना पुरणपोळीचे स्नेहभोजन दिले.
या कार्यक्रमास फलटण तालुका पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजीत राजे नाईक निंबाळकर, नवनिर्वाचित नगरसेवक श्री. पांडुरंग गुंजवटे, मिलकटी गावचे सरपंच मा. श्री. प्रकाश गोडसे, उपसरपंच मा. श्री. निलेश गोरे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेविका, तंटामुक्ती समिती अध्यक्षा, तलाठी, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका, पोलीस पाटील श्री. शांताराम विद्युल काळेल, कृषी अधिकारी गजानन ननावरे, डॉ. शरद कांबळे, उद्योजक प्रीतम नाळे, डॉ. प्रियंका कारंडे, निवृत्त अधिकारी श्रीकांत डिसले, तसेच गावातील आजी-माजी पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी मुधोजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे दुसरे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत शेट्ये, डॉ. वैशाली कांबळे, प्राध्यापक वृंद, सीडीसी सदस्य, प्रशासकीय कर्मचारी, सेवक श्री. संजय सोनार व सर्व स्वयंसेवक उपस्थित होते. या यशस्वी शिबिराने महाविद्यालय व मिलकटी गाव यांच्यातील सामाजिक नाते अधिक दृढ झाले.