
बोधगया (बिहार) | बोधगया येथील महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापनातून बौद्ध समाजाला मुक्ती मिळावी या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात आता वंचित बहुजन आघाडीच्या युवा नेते सुजात आंबेडकर यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला आहे. आंदोलनात भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, बौद्ध समाज दौऱ्याचे प्रतिनिधी आणि वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बोधगया येथे सुरू असून, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी याआधी या आंदोलनाला बोधगयामध्ये हजेरी लावून पाठिंबा दर्शवला आहे.
या लढ्याला बळ देण्यासाठी महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने राज्यभर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती. विविध शहरांमध्ये आंदोलनाचे सत्र सुरू करून, लोकजागृती करण्यात आली.
आता या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून सुजात आंबेडकर यांनी बोधगया येथे थेट उपस्थित राहून बौद्ध समाजाच्या ऐतिहासिक हक्कांसाठी आवाज बुलंद केला आहे.








