
बारामती : “तीनपट परतावा मिळेल” या गोड आश्वासनाने अनेकांना क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीकडे आकर्षित करण्यात आले आणि अखेर त्यांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत समोर आला आहे. या प्रकरणातील एक गुंतवणूकदार आजवर पोलिस ठाण्याचे असंख्य हेलपाटे मारत असूनही, कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही ही बाब चिंताजनक आहे.
‘ब्लॅक औरा’ नावाच्या कंपनीच्या माध्यमातून या फसवणुकीचा डाव रचला गेला. गुंतवणूकदारांना नामांकित हॉटेलमधील सेमिनारमध्ये “दीड वर्षात तीनपट नफा मिळेल” अशी बतावणी करण्यात आली. कंपनीच्या स्थानिक प्रतिनिधींनी सतत पाठपुरावा करून गुंतवणुकीस भाग पाडलं. विशेष म्हणजे, पैसे कंपनीच्या खात्यात न जाता ‘भूपेंद्र मनी ट्रान्सफर’ नावाच्या एका वेगळ्याच खात्यावर पाठवायला लावले.
गुंतवणूक झाल्यानंतर संबंधितांना एका वेबसाईटवर अकाऊंट सुरू करून देण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांची रक्कम वाढत असल्याचं दाखवण्यात आलं. मात्र काही काळाने ही वेबसाईट अचानक बंद पडली. दोन दिवसांत सुरू होईल असं सांगण्यात आलं तरी नंतर ती कायमचीच बंद झाली. त्यानंतर गुंतवणूकदारांनी प्रतिनिधींकडे पैशांसाठी तगादा लावल्यावर सुरुवातीला थोडा वेळ मागण्यात आला आणि नंतर मात्र फोन उचलणंही बंद करण्यात आलं.
आजही हे स्थानिक प्रतिनिधी परिसरात बिनधास्त फिरताना दिसतात. मात्र लाखो रुपयांचा चटका बसलेल्या गुंतवणूकदारांच्या हातात फक्त निराशाच उरली आहे. पोलिसांकडे वारंवार तक्रारी देऊनही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.







