“अध्यक्ष होणार हे आधीच जाहीर केलं… आणि तेच ठरवलं!” – अजितदादांची माळेगाव कारखान्यावर बिनविरोध निवड, संगीता कोकरे उपाध्यक्ष
बारामती :- संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलने जोरदार मुसंडी मारत एकतर्फी वर्चस्व सिद्ध केलं आहे. या निवडणुकीतील विजयानंतर आज कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांची, तर उपाध्यक्षपदी संगीता बाळासाहेब कोकरे यांची बिनविरोध निवड झाली.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीपूर्वीच अजित पवार यांनी अध्यक्षपद स्वतःकडे घेणार असल्याचं जाहीर करून ठेवले होते. त्यानुसार त्यांनी प्रचारादरम्यानच काटेकोर व्यूहरचना आखत सगळी रणनीती स्वतः सांभाळली. या निवडणुकीत निळकंठेश्वर पॅनलने एकूण २१ पैकी तब्बल २० जागांवर विजय मिळवला, तर केवळ एक जागा विरोधी ‘सहकार बचाव शेतकरी पॅनल’चे नेते चंद्रराव तावरे यांनी जिंकली.
आज यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडलेल्या निवडीत अध्यक्षपदासाठी अजितदादा, तर उपाध्यक्षपदासाठी संगीता कोकरे यांचे एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी दिली. अजितदादांची अध्यक्षपदी निवड होताच कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषात आनंदोत्सव साजरा झाला.
अजितदादांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदापासून केली होती. आज ते उपमुख्यमंत्री असूनही, कारखान्याचा कारभार स्वतःकडे घेत त्यांनी सहकार क्षेत्रात पुन्हा एकदा आपली छाप उमठवली आहे. पुढील पाच वर्षांत माळेगाव कारखान्याचा चेहरामोहरा बदलून दाखवू, असा ठाम निर्धारही त्यांनी व्यक्त केला.