
सातारा – भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमाने महाबोधी महाविहार (बोधगया), महू जन्मभूमी व नागपूर दीक्षाभूमी मुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश आंदोलन मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून अभिवादन करून झाली. गगनभेदी घोषणा देत जनसमुदाय जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आगेकूच झाला. या मोर्चात जिल्हा, तालुका व ग्रामशाखांसह आंबेडकरी बहुजन समाजाच्या समविचारी संस्था आणि संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक भालेरव, जिल्हा सरचिटणीस दिलीप फणसे, तालुकाध्यक्ष ऍड. विजयानंद कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना, आंबेडकर स्मारक समिती, सम्यक ज्येष्ठ नागरिक संघ यांसारख्या संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गावोगावांतून आलेल्या जनसमुदायामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आक्रोश घुमला.
या जनआंदोलनाचे औचित्य अनागरिक धम्मपाल यांच्या जयंती दिन आणि दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृति दिनाशी साधण्यात आले. या आंदोलनाच्या मागण्यांसाठी डॉ. ऍड. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी २ ऑगस्ट २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयात बौद्ध इंटरवेंशन याचिका दाखल केली आहे.
मोर्चाच्या सांगता प्रसंगी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. हजारोंच्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित राहून या ऐतिहासिक अस्मिता लढ्याला जोरदार पाठिंबा दर्शविला.








